महाराष्ट्र दुसऱ्या दिवशीही निषेध मोर्चांनी दणाणला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 05:28 AM2019-12-21T05:28:48+5:302019-12-21T05:29:03+5:30

मराठवाड्यात हिंसक वळण; औरंगाबाद, नांदेडमध्ये प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात एल्गार

protests marched the next day against CAA in Maharashtra | महाराष्ट्र दुसऱ्या दिवशीही निषेध मोर्चांनी दणाणला

महाराष्ट्र दुसऱ्या दिवशीही निषेध मोर्चांनी दणाणला

Next

औरंगाबाद/नागपूर/पुणे : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात राज्यातही असंतोष वाढू लागला आहे. शुक्रवारी ठिकठिकाणी निघालेल्या विरोट मोर्चांना मराठवाडा अक्षरक्ष: दणाणून गेला. बीड, परभणी, हिंगोली येथे आंदोलनात हिंसक वळण लागले. खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शांततेत आंदोलन झाले. हिवाळी अधिवेशनासाठी सरकार नागपूरला असून प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरलेल्या जनसमुदायाने शांततामय मार्गाने आपली खदखद व्यक्त केली. खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही शांततेत आंदोलन झाले.
औरंगाबादेत विविध मुस्लीम आणि दलित संघटनांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला. सिडकोतील आझाद चौकातून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात जनसागर उसळला. कडकडीत बंद पाळल्यानंतर दुपारी हजारो बांधव मोर्चात सहभागी झाले. मोर्चानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले.


बीडमध्ये मोर्चातील काही जणांनी रस्त्यावर थांबलेल्या बसवर दगडफेक केली. यावेळी पोलीस व अर्धपोलीस दलाने तात्काळ अश्रूधुराच्या ४ नळकांड्या फोडल्या. आंदोलकांनी पाटोदा-परळी व आणखी एक बस फोडली. तसेच पोलिसांच्या गाडीवर दगडफेक झाली. यात ८ ते १० पोलीस आणि होमगार्ड जखमी झाले. यानंतर काही जणांना अटक करण्यात आली.
कळमनुरी (जि. हिंगोली) येथे एसटी महामंडळाच्या ४ बस फोडल्या. एका बसला जाळण्याचा प्रयत्न झाला. दुपारी नवीन बसस्थानकासमोर मोठा जमाव जमल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रूधुराचे नळकांडेही फोडले. त्यानंतर जमाव पांगला गेला. दिवसभर शहरात कडकडीत बंद पाळला.
परभणी शहरासह जिल्ह्यात पाथरी, पूर्णा, पालम येथे मोर्चा काढण्यात आला. परभणीत मोर्चेकरी परतत असताना काही जणांनी मनपाच्या अग्नीशन दलाच्या गाडीवर दगडफेक केली. त्यानंतर परिसरातील काही घरे, दवाखाना व दुकानांवर दगडफेक केली. या परिसरातील जवळपास १० कार व २५ दुचाकी वाहनांचे नुकसान झाले.


लातूर जिल्ह्यातील निलंगा, औराद शहाजानी आणि किनगाव येथे मोर्चा काढण्यात आला़ लातूर येथे मुंडन आंदोलन करून मूकमोर्चा काढण्यात आला. अहमदपूर, उदगीर, औसा, चाकूर येथेही मूकमोर्चे निघाले.
नांदेडात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले़ हजारोंच्या संख्येने नागरिकांनी तब्बल सव्वातीन तास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठाण मांडले होते़ जिल्हाधिकारी कार्यालय ते शिवाजी पुतळा हा रस्ता गर्दीने ओसंडून गेला होता.
मिरज, पुण्यात एल्गार
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, मिरज, सोलापूर, फलटण येथे आंदोलन झाले. मिरजेत संविधान बचाव कृती समितीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हाती तिरंगा घेऊन सुमारे दहा हजार नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.
पुण्यातही मुस्लीम बांधवांनी मोर्चा काढला. कॅम्प भागातील बाबजान दर्ग्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तेथून कॅम्प भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता बंद केला होता. यावेळी सभेत सर्व धर्मगुरुंनी आंदोलकांना संबोधित केले. तर, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शांततेत आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झााले. ८ जानेवारीला भव्य रॅली काढण्यात येणार आहे. फलटणमध्ये मूक मोर्चा निघाला. सोलापूर जिल्ह्यात बार्शी, माढा आणि मोहोळ तालुक्यात मोर्चे काढले


अहमदनगर शहरासह संगमनेर, राहाता, कोपरगाव, जामखेड शहरात संविधान बचाओ मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मुस्लिम बांधवांबरोबर विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले़


उपराजधानीतही एल्गार
च्हिवाळी अधिवेशनानिमित्त सरकार नागपुरात आली असताना आंदोलनासाठी मुस्लीम समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. मोर्चाची भव्यता इतकी होती की, एलआयसी चौकापासून रामझुला सुद्धा मोर्चाकऱ्यांनी व्यापला होता. मोर्चेकºयांनी अत्यंत शांततेत घोषणाबाजी करीत आपला रोष व्यक्त केला. या मोर्चाला संविधान बचाव असे नाव देण्यात आले होते.अन्य धर्माचे लोकसुद्धा मोर्चात सहभागी होते. मोर्चाला संबोधित करताना धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद मुजीब शरफ म्हणाले की, संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही या मोर्चाचे आयोजन केले आहे. नागरिकता सुधारणा कायद्याला आमचा तीव्र विरोध आहे. हा देश तोडणारा कायदा आहे.
खान्देशही दणाणला
च्खान्देशात जळगाव, भुसावळ, अमळनेर, जामनेर, धुळे व शहाद्यात मोर्चा काढला.
च्‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात ईशान्येमधील आंदोलनाचा वणवा शुक्रवारी खान्देशातील विविध ठिकाणी पसरला. मोर्चा, निदर्शने करत आंदोलकांनी प्रशासनास निवेदन दिले. हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले.


वाह रे मोदी तेरी चाय; काली चाय, काली चाय...
वºहाडात अकोला येथे काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळा चहा बनवून जोरदार घोषणाबाजी करीत अभिनव आंदोलन करण्यात आले. ‘वाह रे मोदी तेरी चाय...काली चाय, काली चाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.

मोर्चे शांततेत काढा
- गृहमंत्री एकनाथ शिंदे
नागरिक सुधारणा कायद्याविरोधात राज्यात काढण्यात येणाºया मोर्चांना अनेक ठिकाणी गालबोट लागले आहे. महाराष्ट्रात सर्वच धर्म, जाती आणि पंथाचे लोक राहतात. त्यांचा आदर करीत लोकांनी मोर्चे शांततेत काढावेत, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे केले.

Web Title: protests marched the next day against CAA in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.