प्रोटोकॉलचा फटाका फुटलाच नाही...!
By Admin | Published: November 3, 2016 12:40 AM2016-11-03T00:40:34+5:302016-11-03T00:40:34+5:30
पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाला लिहिलेल्या पत्राचा फटाका फुटलाच नाही.
पुणे : महापालिकेकडून राजशिष्टाचाराचा भंग होतो त्याबाबत चौकशी करावी, अशा आशयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरविकास विभागाला लिहिलेल्या पत्राचा फटाका फुटलाच नाही. पालिका प्रशासनाने दाखविलेले पुरावे ग्राह्य धरून नगरविकास विभागाने पालिकेला क्लीन चिट दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद; तसेच जिल्ह्यातील अन्य काही स्थानिक स्वराज्य संस्थांनाही अशीच क्लीन चिट मिळाली असल्याचे समजते.
महापौर प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली. ते व पालकमंत्री बापट यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद होत आहेत. पालिका प्रशासनाच्या २४ तास पाणी योजनेतील पाणीटाक्या बांधण्याच्या जाहीर कार्यक्रमात या वादाचा कळस झाला. कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही, जाहिरातींमध्ये पालकमंत्र्यांचे नाव टाकले नाही, असा आरोप करून बापट यांनी महापौरांना धारेवर धरले. त्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी निदर्शनेही केली होती.
नगरविकास विभागाने याची दखल घेत पिंपरी-चिंचवड; तसेच जिल्हा परिषद व अन्य स्थानिक संस्थांच्या या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांना २७ आॅक्टोबरला मुंबईत बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे २८ आॅक्टोबरला पुणे महापालिकेचे नगरसचिव सुनील पारखी, महापौरांच्या स्वीय सहायक योगीता भोसले यांच्याशीही मुंबईत चर्चा केली.
पारखी व भोसले यांनी पालिकेच्या गेल्या वर्षभरातील सर्व जाहीर कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका, कार्यक्रमांआधी बापट यांना लिहिलेली पत्रे, मेल, तसेच कार्यक्रमांच्या ठिकाणी लावलेल्या कोनशिला यांची छायाचित्रे नगरविकास विभागाचे उपसचिव गोखले यांना दाखवली. ते पाहिल्यानंतर गोखले यांनी तक्रारीत तथ्य दिसत नाही, असे सांगून पारखी, भोसले यांना जाण्यास सांगितले.