अभिमानास्पद; आता रेल्वेची बटनंही महिलेच्या हाती
By Appasaheb.patil | Published: February 24, 2020 10:46 AM2020-02-24T10:46:32+5:302020-02-24T10:49:50+5:30
सोलापूरची स्नेहल अंबरकर बनली पहिली रेल्वे लोकोपायलट; मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात होणार लवकरच रुजू
सुजल पाटील
सोलापूर : सोलापूरकरांनो; मोटरसायकल, कार चालविणारी महिला तुम्ही पाहिली असेल... एसटी बस, ट्रक, टेम्पो, रिक्षा चालविणारी महिला पाहिली असेल़...विमान, जहाज, हेलिकॉप्टर चालविणारी महिला देखील पाहिली असेलच ना... पण आता तुम्ही पाहणार आहात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील पहिली महिला लोकोपायलट (रेल्वे चालक)...अन् तेही काही दिवसांतच...
अत्यंत गरीब परिस्थितीचा सामना करून शिक्षण घेतलेली २६ वर्षीय स्नेहल रविकुमार अंबरकर ही लवकरच सोलापूर विभागात लोकोपायलट (रेल्वे चालक) म्हणून रुजू होणार आहे. सोलापूर शहरातील न्यू पाच्छापेठेत राहणारी स्नेहल हिचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण अमर मराठी विद्यालयात झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण लोकसेवा हायस्कूल येथे झाले. त्यानंतर सिद्धेश्वर वूमेन्स पॉलिटेक्निकल महाविद्यालयात डिप्लोमा, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली़ त्यानंतर स्पर्धा परीक्षेंतर्गत आयपीएस, आयएएस व इतर विविध पदांच्या परीक्षा दिल्या़ स्नेहल हिचे वडील किराणा दुकान चालवितात तर आई ही घरकाम करते़ मोठी बहीण ही ग्रामीण पोलीस दलात सायबर क्राईम विभागात कार्यरत आहे़ स्नेहलला दोन भाऊ असून, दोघांचेही उच्च शिक्षण झाले आहे. लवकरच तेही शासकीय नोकरीत दाखल होतील, असे वडील रविकुमार अंबरकर यांनी सांगितले़
भुसावळ येथे ट्रेनिंग झालं पूर्ण
- स्नेहलने लहानपणापासून मोठं काहीतरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगले होते़ त्यानुसार तिने प्राथमिक, माध्यमिक, उच्च व इंजिनिअरिंगचे शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण केले़ शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्नेहलने लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाºया परीक्षेची तयारी सुरू केली अन् काही परीक्षा तिने दिल्या देखील़ सुरुवातीला तिला अपयश आले. मात्र अपयशाने खचून न जाता तिने जिद्दीने पुन्हा परीक्षा दिल्या अन् लोकोपायलटची परीक्षा ती उत्तीर्ण झाली़ तिचे सध्या भुसावळ येथील प्रशिक्षण संपले असून, सोलापूर विभागात तिची नियुक्ती झाली आहे़ लवकरच ती सोलापूर विभागातील रेल्वे गाडी चालविणार आहे़
एकाच वर्षात पाच नोकरीच्या आॅफर
- स्नेहल ही अत्यंत हुशार होती़ तिने लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाºया सर्वच परीक्षा दिल्या होत्या़ २०१९ या वर्षात तिने सिकंदराबाद येथील रेल्वे पोलीस निरीक्षक, मुंबई महानगरपालिकेत क्लार्क, सेल्स टॅक्स आॅफिसर, डी ग्रुप, रेल्वे, लोकोपायलट (मध्य रेल्वे) व अन्य दोन ठिकाणी तिला नोकरीसाठीचं बोलावणं आलं होतं़ पण लोकांची सेवा करण्याचं भाग्य मिळत असल्याने तिने रेल्वे चालक (लोकोपायलट) होणं पसंत केलं़
मोठ्या बहिणीचा हातभार...
- स्नेहल ही गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी़ घरात दोन भाऊ व दोन बहिणी याशिवाय आई, वडील आहेत. वडिलांचे किराणा दुकान आहे तर आई घरकाम करते़ दरम्यान, मोठी बहीण प्रियंका अंबरकर हिने जिद्दीने उच्च शिक्षण पूर्ण करून पोलीस खात्यात रुजू झाली़ सोलापूर ग्रामीण पोलीस दलात सायबर क्राईम विभागात काम करीत तिने आपल्या दोन्ही भावांसह एका बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली़ शिक्षणासाठी हवं ते दिलं़ दोन्ही भावांनी व स्नेहलने बहिणीच्या हातभाराची दखल घेत उच्च पदस्थ होण्याचा मान मिळविला़
प्रियंका व स्नेहल या माझ्या दोन मुली अत्यंत हुशार.त्यांची हुशारी पाहून माझ्या दोन्ही मुलांनीही चांगले शिक्षण घेतले़ प्रियंका ही ग्रामीण पोलीस दलात तर आता स्नेहल ही रेल्वे खात्यात रुजू झाली़ थोड्याच दिवसात दोन्ही मुलेही शासकीय सेवेत रुजू होतील़ माझ्या या मुला-मुलींचे यश पाहून खूप आनंद होत आहे़ या चौघांमुळे मला समाजात चांगला मान मिळत आहे़ खरंच या चौघांनी माझं नाव कमावलं एवढेच म्हणेऩ़़
- रविकुमार अंबरकर, स्नेहलचे पिता
माझ्या कुटुंबातील आई, वडील, दोन्ही भाऊ व बहिणीने दिलेली खंबीर साथ यामुळेच मी उच्च पदापर्यंत पोहोचू शकले़ एवढ्यावरच न थांबता लोको इन्स्पेक्टर (वरिष्ठ प्रबंधक) पदाची परीक्षा पास होण्याची इच्छा आहे़ एवढेच नव्हे तर एकेदिवशी राजधानी एक्स्प्रेस चालविण्याचेही मी ध्येय ठेवले आहे़ खरंच हे सर्व माझ्या कुटुंबातील सदस्यांचे यश आहे़
- स्नेहल अंबरकर, लोकोपायलट (रेल्वे चालक)