अभिमानास्पद! सोहम सुखठणकरने मिळवला शब्दकोषावर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:32 PM2019-06-15T23:32:02+5:302019-06-16T06:33:42+5:30
जगभरातील मराठी भाषिकांना अभिमान वाटावा अशी बाब; जगभरातून आठ जणांची निवड
या मुलांना आमच्याच शब्दकोषातील शब्दच नाही तर सर्वच शब्द आणि त्यांचा अर्थ माहीत होते. या मुलांचं शब्दज्ञान व शब्दसंग्रह पाहून खरोखरच आश्चर्य वाटलं... हे उद्गार आहेत जॅक बेली यांचे नुकत्याच झालेल्या नॅशनल बी स्पेलिंगच्या आधी होणाऱ्या (पात्रता) परीक्षेत पास झालेल्या मुलांबद्दल. या परीक्षेला स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी म्हणतात. या शब्दकोषावर (डिक्शनरी) पूर्ण विजय मिळवणाऱ्या आठ स्पर्धक मुलांची नावं एकत्रितपणे जाहीर करण्यात आली, त्यात सोहम सुखठणकर हा भारतीय आणि मराठी मुलाचाही उल्लेख होता. जगभरातील मराठी भाषिकांना अभिमान वाटावा, अशीच ही बाब.
त्याचे वडील मंदार व आई गार्गी हे सातत्याने या परीक्षेची तयारी करून घेत होते. दर शनिवार व रविवार सात ते आठ तास सोहम याची तयारी करीत होता. एखाद्या शब्दाचं केवळ स्पेलिंग पाठ करणं वा ते माहीत असणं, एवढाच परीक्षेचा उद्देश नाही. माहीत नसलेले शब्द शोधणे, त्यांचा उगम कोणत्या भाषेतून झाला आहे याही बाबी स्पर्धकांना लक्षात ठेवाव्या लागतात. रोजची शाळा व अभ्यास सांभाळून हे करावं लागतं. तो आता राष्ट्रीय स्तरावर निवडला गेला आहे. सोहमचे वडील मंदार हे सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनशी संबंधित आहेत. तिथे शिकवल्या जाणाऱ्या मन:शक्ती (माइंड मॅनेजमेंट) च्या तंत्रज्ञानाने हे शक्य झालं, असं त्यांचं म्हणणं आहे.
शब्दकोषावर हवे प्रभुत्व
यात भाग घेणाऱ्या स्पर्धकांना शब्द, स्पेलिंग, त्याची रुपे, कोणत्या भाषेतून उगम झाला आदी सर्व बाबी माहित असाव्या लागतात.