आरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा!
By admin | Published: November 6, 2016 02:24 AM2016-11-06T02:24:38+5:302016-11-06T02:24:38+5:30
आर-मध्य विभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या तडकाफडकी बदलीमागे भाजपा नेत्याचा हात असल्याचा आरोप होत असल्याने अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे
मुंबई : आर-मध्य विभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या तडकाफडकी बदलीमागे भाजपा नेत्याचा हात असल्याचा आरोप होत असल्याने अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी स्पष्टीकरण देत आपला बचाव केला. आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा, असे
आव्हान त्यांनी शिवसेनासह
विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना
दिले आहे. त्यामुळे अधिकारी
बदली प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत.
बोरीवली येथील आर-मध्य विभागाचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांची दोन दिवसांपूर्वी तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र ते कर्तव्यदक्ष अधिकारी असून, स्थानिक आमदारांच्या दबावामुळे पालिका प्रशासनाने ही बदली केल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला.
ही बदली रद्द करण्यासाठी शनिवारी केलेल्या ठिय्या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेबरोबरच शिवसेनेचे नगरसेवकही सामील झाले होते.
मात्र या आरोपांचे खंडन करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपला या प्रकरणाशी संबंध नाही. गांधी यांच्या बदलीसाठी आपण आयुक्तांवर दबाव आणला नाही. त्यांची बदली का केली? हे आयुक्तांनाच विचारावे, तसेच माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी ते सिद्ध करावे, अन्यथा माझी जाहीर माफी मागावी, असे आव्हान प्रसारमाध्यमांशी बोलताना तावडे यांनी विरोधी पक्षांसह शिवसेनेलाही दिले आहे. (प्रतिनिधी)