पुढील ८ दिवसांत माझ्यावरील आरोप सिद्ध करा; सुनील शेळकेंचं शरद पवारांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:53 PM2024-03-07T14:53:01+5:302024-03-07T14:53:56+5:30
मेळाव्यात मिळणारा कमी प्रतिसाद पाहून आयोजकांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली असा आरोप शेळकेंनी केला.
मावळ - Sunil Shelake on Sharad Pawar ( Marathi News ) माझ्याबाबतीत शरद पवारांनी असं विधान का केले हे मी त्यांना भेटून विचारणार आहे. जर माझे काही चुकले तर मी जाहीर माफी मागेन. पुढच्या ८ दिवसांत ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांनी साहेबांना सांगावे, नाहीतर मी राज्यभरात सांगणार साहेबांनी माझ्याबाबतीत मतदारसंघात येऊन चुकीचे वक्तव्य केले हे सांगेन असं आव्हान आमदार सुनील शेळकेंनी शरद पवारांना दिले आहे.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, शरद पवारांनी आजपर्यंत कधी कुणावरही असं विधान करताना मी पाहिले नाही. व्यक्तिगतही टिप्पणी केल्याचे पाहिलं नाही. परंतु माझ्याबाबतीत असं का बोलले हे भेटून विचारणार. कुणी माहिती दिली, माझे काय चुकले हे मी नक्कीच विचारणार आहे. पुढच्या काळात मलाही सांभाळून काम करावे लागेल. सत्ता, पद, प्रतिष्ठा ही क्षणिक आहे. ज्या मावळच्या मायबाप जनतेने माझ्यावर प्रेम केले ते आजही माझ्यासोबत आहेत. राजकारणात भविष्यात काय होईल याची मी पर्वा करत नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार इथं आले होते. ज्यांनी हा मेळावा आयोजित केला त्यांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली. शेकडो कार्यकर्ते अजित पवारांची साथ सोडून आपल्याकडे यायला तयार आहेत. आपण आलात तर पक्षप्रवेश करून त्यांना सन्मानित करायचे आहे. शेकडो कार्यकर्ते सांगितले आणि केवळ ३५-४० कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. ठाकरे-काँग्रेसचे कार्यकर्ते मेळाव्याला होते. संपूर्ण कार्यक्रमाचा फज्जा उडतोय हे पाहून आयोजकांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली. सुनील शेळकेंनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशाप्रकारे धमकी दिली असं सांगितल्यानंतर शरद पवारांनी हे विधान केले असंही शेळकेंनी सांगितले.
दरम्यान, मागील ६ महिन्यापूर्वीच्या घडामोडीचा मीदेखील साक्षीदार आहे. भाजपात जाण्यासाठी कोण कोण आग्रही होते. त्यातून अजितदादांना ऐनवेळी तोंडघशी पाडणे हे पाहिले आहे. त्यामुळे अजितदादांना टार्गेट करून रोहित पवार, जितेंद्र आव्हाड हे नेते होऊ शकत नाही. शेवटी दादाच्या कामाचा आवाका, ३०-३५ वर्षाचे योगदान माहिती आहे. स्वत:च्या स्वार्थासाठीच राजकारण करायचे असेल तर आम्हालाही जाहीरपणे बोलले पाहिजे असा इशारा सुनील शेळकेंनी दिला आहे.