‘त्या’ गुणपत्रिका न मिळाल्यास गोपनीय गुण देणार - बोर्ड
By admin | Published: April 24, 2017 03:37 AM2017-04-24T03:37:51+5:302017-04-24T03:37:51+5:30
दहिसर येथील इस्त्रा शाळेतून चोरीला गेलेल्या उत्तरपत्रिकांपैकी अजूनही १०० उत्तरपत्रिकांचा शोध सुरू आहे. या उत्तरपत्रिका
मुंबई : दहिसर येथील इस्त्रा शाळेतून चोरीला गेलेल्या उत्तरपत्रिकांपैकी अजूनही १०० उत्तरपत्रिकांचा शोध सुरू आहे. या उत्तरपत्रिका न मिळाल्यास गुण कसे देणार, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर उत्तरपत्रिका एका महिन्याच्या आत सापडल्यास गुण देणे शक्य होईल. अन्यथा गोपनीय पद्धतीने या उत्तरपत्रिकांना गुण दिले जाणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरळीतपणे सुरू आहे, पण दोन आठवड्यांपूर्वी इस्त्रा शाळेतून तीन विषयांच्या एकूण ४१६ उत्तरपत्रिका चोरीला गेल्या होत्या. यामध्ये भंगारवाला म्हणून शाळेत आलेल्या एका अज्ञात इसमाने या उत्तरपत्रिका चोरल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. या आधारावर शोध घेत असताना, पोलिसांना ३१६ उत्तरपत्रिका हाती लागल्या. मात्र, उर्वरित १०० उत्तरपत्रिकांचा शोध अद्याप लागलेला नाही.
चोरीला गेलेल्या १०० उत्तरपत्रिका एका महिन्याच्या आत मिळाल्यास त्याची तपासणी करून निकाल लावणे शक्य आहे. मात्र, असे न झाल्यास गोपनीय पद्धतीने गुण दिले जाणार आहेत. वेळेवर निकाल लावण्यासाठी ही पद्धत अवलंबली जाणार असल्याचे पोलिसांना कळवण्यात आले आहे. नॅशनल पार्क भागात या उत्तरपत्रिकांचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)