जिल्हा बँकांसाठी तरतूद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2016 04:35 AM2016-12-24T04:35:42+5:302016-12-24T04:35:42+5:30
नोटाबंदीमुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना दररोज लाखो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा तोटा
सांगली : नोटाबंदीमुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना दररोज लाखो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी माजी ग्रामविकास व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केली. सहकारी क्षेत्रावर अविश्वास दाखवून ज्या राष्ट्रीयीकृत व नागरी बँकांच्या व्यवस्थेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास दाखविला, त्याच व्यवस्थेकडून नोटांच्या बॅगाच्या बॅगा बदलून काळ्याचे पांढरे करण्यात आल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.
सांगली जिल्हा बँकेच्या कार्यालय नूतनीकरणाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले, या वेळी ते बोलत होते.
नोटाबंदीचे शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत. जिल्हा बँकांना नोटा बदलून देण्यास व भरून घेण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे राज्यातील २८ हजार गावांतील जनतेला नोटा बदलण्यासाठी त्रास सहन करावा लागला. सांगली जिल्हा बँकेत ३१५ कोटी रुपये जमा झाले. त्याचा दररोजच्या सहा लाख रुपये व्याजाचा भुर्दंड बँकेला सहन करावा लागत आहे. राज्यातील इतर जिल्हा बँकांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. आपल्याकडील बँकांची स्थिती भक्कम आहे. पण मराठवाडा, विदर्भातील जिल्हा बँकांची स्थिती पाहता, त्या पुन्हा सुरू होतील की नाही, अशी शंका आहे. (प्रतिनिधी)
मोदींनी जाब विचारावा : जयंत पाटील
गेल्या दोन आठवड्यांत नव्याकोऱ्या कोट्यवधींच्या दोन हजार रुपयांच्या नोटांची बंडले सापडू लागली आहेत. सामान्य माणसे बँकेसमोर रांगेत आहेत. त्यांना दोन हजार रुपये देताना बँकांचे हात जड होत आहेत. मग इतक्या मोठ्या प्रमाणात नव्या नोटा बाहेर कशा आल्या? या व्यवस्थेला मोदी जाब विचारणार आहेत का?
- जयंत पाटील, माजी मंत्री