दिरंगाई न करता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 11:43 AM2017-08-09T11:43:37+5:302017-08-09T12:19:32+5:30
मुंबईतून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद बुधवारी सकाळी विधानभवनात उमटलेले बघायला मिळाले.
मुंबई, दि. 9- मुंबईतून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद बुधवारी सकाळी विधानभवनात उमटलेले बघायला मिळाले. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळ झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झालेले बघायला मिळालं. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची नाही. आत्तापर्यंत शिस्तबद्ध मोर्चे निघाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुणीही राजकारण करू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितलं. आरक्षण न देण्याचं कोणतंही कारण नसताना आरक्षण द्यायला दिरंगाई नको. सरकारने लवकरात लवकर ठोस भूमिका घ्यावी. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकढा पाठिंबा असताना सरकारचं घोडं अडलं कुठे? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचं विधीमंडळाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे लक्ष लागलं आहे, मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय़ घ्यावा, असंही अजित पवार म्हणाले आहेत. पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधकांचा गदारोळ बघायला मिळाला. 'चर्चा नको आरक्षण हवं' अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणाबाजीमुळे दुपारी ३ वाजेपर्यंत विधानभवनाचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.
आरक्षणाच्या मागणीवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये घमासान झालेलं बघायला मिळालं. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या तसंच बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा विविध मागण्यांसाठी मुंबईतून मोर्चा निघाला आहे. या मोर्चामध्ये अनेक राजकीय नेत्यांचासुद्धा सहभाग आहे.
विरोधी पक्षाकडून सभागह सुरू असताना सुरूवातीचा प्रश्नोत्तराचा तास बाजूला सारावा, अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सगळ्यांचाच पाठिंबा मिळतो आहे. आज मुंबईत लाखोंच्या संख्येने मराठाबांधव एकवटे आहेत. मुंबईमध्ये अशी परिस्थिती असताना, सरकार मात्र विरोधकांना भूमिका मांडू देत नाही, या मुद्द्यावरून विरोधकांनी विधीमंडळात गोंधळ घातला. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भात विधीमंडळात विरोधकांना भूमिका मांडू द्यायची मागणी विरोधकांनी अध्यक्षांकडे केली पण त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. सत्ताधाऱ्यांनी सभागृह सुरू ठेवू दिलं नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे.
सकाळी जेव्हा मराठा मोर्चा सुरू होत होता तेव्हा सत्ताधारी पक्षातील आमदार तिथे गेले होते पण मराठाबांधवांनी त्यांना प्रवेश नाकारला. सरकारने असं दुटप्पी राजकारण करू नये, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
फेटे बांधून विरोधी पक्षाचे आमदार मोर्चात सहभागी
विधानभवनात मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे तीव्र पडसाद उमटले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून विधानभवनात जोरदार गदारोळ झाला. या गदारोळानंतर फेटे बांधून विरोधी पक्षाचे आमदार मोर्चात सहभागी झाले आहेत. विधानभवनातून विरोधक आझाद मैदानाकडे रवाना होत त्यांनी मोर्चात सहभाग घेतला. विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीही केली. यावेळी सतेज पाटलांनी अजित पवारांना फेटा बांधला.