ग्रामस्थांच्या मागणीनुसार तत्काळ टँकर पुरवा - मुख्यमंत्री; जिल्ह्यांतील दुष्काळाचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 04:19 AM2019-05-15T04:19:03+5:302019-05-15T04:19:27+5:30
ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर्स व रोहयो कामांचे नियोजन करून प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.
मुंबई : ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर्स व रोहयो कामांचे नियोजन करून प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.
नागपूर, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आॅडिओ ब्रीजद्वारे घेतला. स्थानिक अधिकारी, काही सरपंचांनी मांडलेल्या समस्या जाणून घेत प्रशासनाला तत्काळ निर्देश दिले. हिंगोलीतील सरपंचांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करताच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
दुष्काळ निवारणासाठी सध्याची स्थिती पाहून चारा छावणी, टँकरपुरवठा, नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आदी तातडीच्या उपायांवर भर द्यावा. नळ पाणीपुरवठा योजना नाहीत, अशा ठिकाणी या योजना सुरू करण्यासंदर्भात अहवाल तयार करावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.
गावात नदी, नाले व विहिरी आहेत; परंतु त्यामध्ये गाळ साचल्यामुळे पाणीसाठा होत नसल्याच्या तक्रारी नागपूर जिल्ह्यातील सरपंचांनी करताच फडणवीस यांनी तातडीने या गावामध्ये गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून या जलस्रोताच्या ठिकाणचे गाळ काढणे व खोलीकरण करण्याचे निर्देश दिले. या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.