अस्वच्छतेमुळे केलेल्या कारवायांची माहिती द्या!
By Admin | Published: December 24, 2014 12:06 AM2014-12-24T00:06:02+5:302014-12-24T00:31:50+5:30
राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने दिले रेल्वे प्रशासनाला निर्देश.
अकोला : रेल्वे मार्गांवर आणि स्थानकांवर अस्वच्छता पसरविणार्या घटकांवर वर्षभरात विभागनिहाय करण्यात आलेल्या कारवाया आणि दंडवसुली आदी माहिती सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने रेल्वे प्रशासनास दिले आहेत.
२0१२ मध्ये रेल्वे बोर्डाने कायदेशीर नियमावली तयार करून रेल्वे मार्ग आणि स्थानकांवर अस्वच्छता पसरविणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजार रुपये दंड वसूल करणे सुरू केले आहे. दंडापोटी वसूल केलेल्या या रकमेतून अंशत: राशी ही राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे वळती केली जाते. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या मुख्य उद्देशाने २0१0 मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने रेल्वेच्या चारही झोनमध्ये वर्षभरात अस्वच्छतेपोटी केलेल्या कारवाया आणि दंड म्हणून वसूल करण्यात आलेली राशी आदींबाबत झोननिहाय सविस्तर माहिती भारतीय रेल्वे प्रशासनाकडे मागितली आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने हरित प्राधिकरणाकडे केवळ उत्तर झोनमधील माहिती सादर केली असून, वर्षभरात उत्तरेतून रेल्वेने १ कोटी १२५ लाख रक्कम दंडापोटी वसूल केली असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने अद्याप पूर्व, पश्चिम आणि दक्षिण झोनमधील माहिती सादर केली नसल्याने २४ डिसेंबरपूर्वी ती सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित प्राधिकरण आयुक्तांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.