घटक पक्षांच्या उमेदवारांची माहिती द्या!

By Admin | Published: September 30, 2014 12:42 AM2014-09-30T00:42:31+5:302014-09-30T01:02:15+5:30

भाजप पक्षश्रेष्ठींचे जिल्हाध्यक्षांना आदेश

Provide information on constituent parties! | घटक पक्षांच्या उमेदवारांची माहिती द्या!

घटक पक्षांच्या उमेदवारांची माहिती द्या!

googlenewsNext

अकोला : महायुती तुटल्यानंतर उमेदवार निश्‍चित करताना उडालेला गोंधळ बघता, भाजपने त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्षांच्या नेत्यांकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना तातडीने ही माहिती प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेश भाजपने दिले असून, संपूर्ण माहिती गोळा झाल्यानंतर कुणाची उमेदवारी कायम ठेवायची आणि कुणाला माघार घ्यायला लावायची, याबाबत निर्णय होणार आहे.
भाजप-शिवसेनेची २५ वर्षांची युती यंदाच्या निवडणुकीत संपुष्टात आली. राज्याच्या राजकारणातील ही सर्वात मोठी उलथापालथ आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होण्यास केवळ दोन दिवसांचा अवधी असताना, युती तुटल्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ झाली. या धाव पळीत महायुतीमध्ये भाजप-शिवसेनेसोबत असलेल्या घटक पक्षांच्या उमेदवारांची फरफट झाली. कोणता मतदारसंघ कोणत्या घटक पक्षाला सोडण्यात आला, याबाबतची निश्‍चित माहितीच नसल्यामुळे, काही मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (आठवले गट) आणि शिवसंग्रामच्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले. काही ठिकाणी घटक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरताना, थेट भाजपचा उमेदवार म्हणून अर्ज सादर केले. पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी मेहकर येथून भाजपतर्फे उमेदवारी दाखल केली. खामगाव येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हेमेंद्र ठाकरे यांनी, तर वाशिम मतदारसंघातून रिपाइंचे (आठवले गट) तेजराव वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अकोला जिल्ह्यात बाळापूर मतदारसंघातून शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील लोड यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला असून, अकोला पूर्व मतदारसंघातून रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक नागदेवे यांचा अर्ज आहे. या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्राबाबतची माहिती भाजपच्या जिल्हा कार्यालयाकडून प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठविली जात आहे. घटक पक्षांच्या सर्व उमेदवारांची माहिती गोळा केल्यानंतर कोणत्या मतदारसंघात कुणाची उमेदवारी कायम ठेवायची आणि कुणाला माघार घ्यायला लावायची, याबाबतचा निर्णय पक्षस्तरावर होणार आहे.

Web Title: Provide information on constituent parties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.