योजनांची माहिती वेबसाइटवर द्या
By Admin | Published: April 2, 2017 01:25 AM2017-04-02T01:25:40+5:302017-04-02T01:25:40+5:30
राज्य सरकारची सर्व खाती आणि महापालिकांनी त्यांच्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती एका विवक्षित प्रारूपामध्ये ३० एप्रिलपर्यंत
मुंबई : राज्य सरकारची सर्व खाती आणि महापालिकांनी त्यांच्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती एका विवक्षित प्रारूपामध्ये ३० एप्रिलपर्यंत आपापल्या वेबसाइटवर उपलब्ध करून द्यावी, असा आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिला आहे.
संबंधित खात्याने ही माहिती देताना कल्याणकारी योजनेचे नाव, तिची ठळक वैशिष्ट्ये, त्यासाठी अंदाजपत्रकात करण्यात आलेली तरतूद आणि अपेक्षित लाभार्थींची संख्या, पात्रता निकष, अर्जाचा नमुना, अर्ज प्राप्त झाल्याची व मंजूर झाल्याची तारीख आणि अर्ज नाकारला असल्यास त्याची थोडक्यात कारणे इत्यादी तपशीलही त्यात असावा, असे माहिती आयोगाने सांगितले आहे. माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी केलेल्या अर्जावर हा आदेश देण्यात आला. ‘हकदर्शक’ ही स्वयंसेवी संस्था माहिती अधिकारान्वये अशी माहिती घेऊन ती सामान्यांना सहज समजेल अशा प्रकारे उपलब्ध करून देत असते. संस्थेने अशा प्रकारे एकेका खात्याकडे अर्ज करून माहिती घेऊन ती प्रसिद्ध करण्याऐवजी सरकारने स्वत:हूनच ही सर्व माहिती उपलब्ध केल्यास लोकांची मोठी सोय होईल. त्यामुळे आयोगाने तसा आदेश द्यावा, अशी विनंती गांधी यांनी केली होती.
योग्य माहितीअभावी सामान्य लोक या योजनांविषयी अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांना या योजनांचा अपेक्षेनुसार लाभ घेता येत नाही. शिवाय जनजागृती नसल्याने भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांनाही वाव मिळतो. त्यामुळे अशी माहिती वेबसाइटवर उपलब्ध करणे गरजेचे आहे, असेही मुख्य माहिती आयुक्तांनी नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)