शेतमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी
By admin | Published: April 8, 2017 01:47 AM2017-04-08T01:47:30+5:302017-04-08T01:47:30+5:30
ग्राहक आणि शेतकरी हा थेट दुवा जोडण्याची आवश्यकता आहे
बारामती : ग्राहक आणि शेतकरी हा थेट दुवा जोडण्याची आवश्यकता आहे. त्यातून शेतमाल विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाजवी भाव आणि ग्राहकांना योग्य दरात शेतमाल ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. शेतमालाला हमीभाव आणि हक्काची बाजारपेठ प्रत्येक तालुक्यात उपलब्ध झाली पाहिजे, असे मत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी येथे व्यक्त केले.
ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र व बाजार समितीच्या वतीने आयोजित पाचव्या धान्य महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्यासह नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अतारीचे संचालक डॉ. लखनसिंग यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी संस्थेचे विश्वस्त विष्णूपंत हिंगणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
या वेळी पवार म्हणाल्या, शेतकऱ्यांना वाजवी भाव आणि ग्राहकांना योग्य दरात शेतमाल ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. त्यासाठी अगदी गावनिहाय, केंद्रनिहाय कायमस्वरूपी असे उपक्रम राबवावेत. यावर्षीच्या धान्य महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले खपली, गहू, ज्वारीच्या विविध जातींचे उत्पादन, बाजरी, तांदूळ, कडधान्ये, देवगड व हापूस आंबा, डाळी, प्रक्रियायुक्त पदार्थ, मातीची भांडी असे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकूण ५७ स्टॉल या महोत्सवात आहेत. महिला बचत गटही यामध्ये सहभागी आहेत.