दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या - मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 05:46 PM2021-03-19T17:46:23+5:302021-03-19T17:57:39+5:30

Maharashtra chief minister Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांनी धडगाव ग्रामीण रुग्णालय येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन कोरोना लसीकरणाची माहिती घेतली.

Provide necessary facilities for immunization of citizens in remote areas - CM | दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या - मुख्यमंत्री 

दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या - मुख्यमंत्री 

Next
ठळक मुद्देधडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.बैठकीनंतर कृषी विभागाच्या फळ रोपवाटिकेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली.

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतर देखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरीक अंतराचे पालन करावे, यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात यावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. (Maharashtra chief minister Uddhav Thackeray said Provide necessary facilities for immunization of citizens in remote areas )

धडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी, कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार मंजुळा गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात परंतु ग्रामीण आणि विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना अशा सुविधा मिळणे आवश्यक आहे.  कोरोना संसंर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. कोविडचा धोका पुन्हा वाढला आहे. मात्र यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा आपल्याकडे आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून त्यात यापुढेही सातत्य ठेवण्यात यावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तोरणमाळ पर्यटन विकास आराखडा तयार करा
तोरणमाळ पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, पर्यटन विकासाच्या माध्यमातून येथील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. विकास आराखडा तयार करताना प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. परिसरात पळसाची झाडे रांगेत लावण्यासारख्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या संकल्पना राबवाव्या. लवकरच पर्यटन मंत्र्यांच्या समवेत याबाबत बैठक घेण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पालकमंत्री पाडवी म्हणाले, जिल्ह्यात फळबाग लागवड कार्यक्रम राबविल्यास 200 डोंगर हिरवे होतील.  त्यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग घेता येईल. जिल्ह्यातील आश्रम शाळांमधून सॅटेलाईट एज्युकेशन राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्यात मनरेगाच्या माध्यमातून यावर्षी विक्रमी फळबाग लागवड झाल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

धडगाव येथे लसीकरणाचा आढावा
मुख्यमंत्र्यांनी धडगाव ग्रामीण रुग्णालय येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन कोरोना लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांना मास्क घालून शारिरीक अंतराचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

फळरोपवाटिकेची पाहणी
बैठकीनंतर कृषी विभागाच्या फळ रोपवाटिकेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. त्यांनी रोपवाटिकेबाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी फळबाग लागवड महत्वाची ठरेल. त्यादृष्टीने जिल्ह्यासाठी आणखी फळबाग रोपवाटिका तयार करण्यास शासन सहकार्य करेल, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. सीडबॉल तयार करून ते अधिक पाऊस असलेल्या भागातील उजाड डोंगरावर टाकण्याचा कार्यक्रम राबवावा, अशी सूचना त्यांनी केली.

लसीकरणाबाबत दुर्गम भागातील जनतेला दिला विश्वास
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा केली.  दुर्गम भागातील माझ्या माताभगिनी आणि बांधवाना कोरोना लसीकरणाची चांगली सुविधा मिळते का हे पाहण्यासाठी मोलगी येथून लसीकरण केंद्राच्या भेटीला सुरुवात करीत आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, लस घेताना कोणतीही भीती मनात बाळगू नका. कोरोनाचे संकट वाढत असले तरी सर्वांनी निश्चय केल्यास त्यावर मात करता येईल. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराचे पालन सुरू ठेवा. आपण स्वतः लस घेतली असून त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याने  घाबरू नका, अशा शब्दात त्यांनी लसीकारणासाठी आलेल्या नागरिकांना विश्वास दिला.  

तोरणमाळ विद्युत उपकेंद्रासाठी सहकार्य करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धडगाव तालुक्यातील सुरवणी विद्युत उपकेंद्राच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले आणि उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. काम पूर्ण करण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, दुर्गम भागातील विजेची समस्या दूर करण्यासाठी तोरणमाळ येथील विद्युत उपकेंद्रासाठी 16 कोटींचा प्रस्ताव पाठविल्यास त्यालाही सहकार्य करण्यात येईल, असेही उद्धव ठाकरे सांगितले.
 

Web Title: Provide necessary facilities for immunization of citizens in remote areas - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.