CoronaVirus रेशनमधून तेल, डाळ, साखरही मिळणार?; आमदारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 06:57 AM2020-04-07T06:57:34+5:302020-04-07T06:57:58+5:30
मजुरांना दिलासा द्या, केशरी कार्डधारकांनाही धान्य द्या, सर्वपक्षीय आमदारांची मागणी, राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक
यदु जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी होत असून या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय आमदारांनी रेशन दुकानांमधून खाद्यतेल, डाळ, साखर व चहाचाही पुरवठा करावा अशी एकमुखी मागणी केली आहे. बांधकाम व संघटित क्षेत्रातील मजुरांची कामेच बंद असल्याने त्यांच्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे म्हणून त्यांना तत्काळ आर्थिक मदत करा, असेही आमदारांनी म्हटले आहे.
रेशन दुकानांमधून पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आधी नियमित धान्य विकत घ्यावे लागेल अशी अट राज्य सरकारने टाकली आहे. एवढेच नव्हे तर तीन महिन्यांचा तांदूळ एकाच वेळी न देण्याचे ठरवले आहे. बऱ्याच आमदारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विनाअट मोफत तांदूळ देण्यात यावा अशी भूमिका त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.
केवळ पिवळे कार्डधारकांना धान्य वाटप करून चालणार नाही तर तेवढ्याच प्राधान्याने केशरी कार्डधारकांनादेखील रेशन दुकानांमधून धान्य द्या, अशी आमदारांची भावना आहे.
बांधकाम मजुरांच्या हक्काचा साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी शासनाकडे जमा आहे, त्यातून त्यांना निदान दोन हजार रुपये द्यावेत असा आग्रह आमदारांनी धरला. राज्यात किमान २० जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा हजारो हेक्टरमधील पिकांना मोठा फटका बसला असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणीही या आमदारांनी केली.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, डॉ. संजय कुटे, अमित झनक, भारत भालके, अनिल बाबर, प्रणिती शिंदे, रणधीर सावरकर, पंकज भोयर, सचिन कल्याणशेट्टी, विकास ठाकरे, प्रशांत बंब, डॉ. तुषार राठोड, किशोर जोरगेवार,राजूभाऊ एकडे आदी आमदारांनी या भावना व्यक्त केल्या.
काय म्हणतात आमदार?
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था शासनाने करावी.
आदिवासी भागात खावटी योजना सुरू करावी.
सगळीकडे गहू कापणीला आहे. गव्हाची कापणी करण्यासाठी हार्वेस्टर मशीन पंजाबमधून आणल्या जातात. यावेळी त्या पोहोचणे शक्य नसल्याने गहू कापणीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर सरकारने मार्ग काढावा.
द्राक्ष ,केळी या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कारण बाजारपेठ नाही अशा वेळी सरकारने मदत देण्याची गरज आहे.
भाजीपाला किराणा लोकांना घरपोच मिळावा यासाठी तत्काळ यंत्रणा उभी करावी.
मंत्रिमंडळ बैठक होणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी सायंकाळी ५ ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार आहेत. बहुतेक मंत्री हे सध्या त्यांच्या गृहजिल्ह्यात आहेत.