१ एकरात हर्बल वनस्पती लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करुन द्यावे; शेतकऱ्याचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 11:43 AM2021-10-23T11:43:15+5:302021-10-23T11:46:22+5:30
Sharad Pawar Statement Controversy: आता एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हर्बल वनस्पती लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी अजब मागणी केल्यानं हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.
मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणाची चर्चा जोरदार सुरू आहे. मुंबई क्रुझवर रेव्ह पार्टीवर (Mumbai Cruise Rave Party) एनसीबीने धाड टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान(Aryan Khan) याला अटक केली. या अटकेनंतर राज्यातील मविआ सरकारचे मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
यातच नवाब मलिकांच्या जावयाकडे सापडलेल्या ड्रग्जवरुन अनेकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा शरद पवारांनी(Sharad Pawar) मलिक यांच्या जावयाकडे एक प्रकारची हर्बल वनस्पती सापडल्याचं विधान केले. याच विधानावरुन सोशल मीडियात धुमाकूळ सुरू आहे. त्यातच आता एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हर्बल वनस्पती लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी अजब मागणी केल्यानं हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.
वाचा शेतकऱ्यानं लिहिलेलं पत्र जसच्या तसं...
मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा
विषय – एक एकर हर्बल वनस्पती गांजा लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावेत व लागवडीसाठी परवानगी मिळणेबाबत
महोदय,
वरील विषयास अनुसरुन अर्ज सादर करतो की, मी देऊळगाव येथील शेतकरी असून १ एकर शेतात हर्बल वनस्पती गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी व या वनस्पतीचे बियाणे उपलब्ध करून द्यावेत ही विनंती. मी शेतकरी असून अनेक दिवसांपासून भाजीपाला शेती करतो. शेतात कुठलेही पीक घेतले तरी हमीभाव नसल्याने शेती तोट्यात करावी लागते. शेती मालाला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणं कठीण झालं आहे. शेती पिकाला लावलेला खर्च सुद्धा निघत नाही.
परिणामी माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. घर चालवणे कठीण झाले आहे. एवढे पिक पिकवून सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. तरी मला १ एक हर्बल वनस्पती गांजा बियाणे उपलब्ध करुन द्यावे. महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिकसाहेब यांचे जावई यांच्या शेतात हर्बल वनस्पती सापडली. त्याचे समर्थन देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार साहेब यांनी केले तरी मला सुद्धा माझ्यावर बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी हर्बल गांजा वनस्पतीचे बियाणे उपलब्ध करुन द्यावे ही नम्र विनंती. मला आत्महत्या करायची नाही मला जगायचं आहे.
आपलाच शेतकरी
मधुकर उत्तमराव शिंगणे
काय म्हणाले होते शरद पवार?
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली होती. एनसीबीला तंबाखू आणि अमली पदार्थातील फरकही कळत नाही, अशी टीका एनसीबीवर केली होती.