विद्यापीठाला तंत्रज्ञानाची जोड देणार
By Admin | Published: July 9, 2015 02:31 AM2015-07-09T02:31:00+5:302015-07-09T03:10:07+5:30
मुंबई विद्यापीठाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची ग्वाही नवे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली. मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला.
मुंबई : मुंबई विद्यापीठाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची ग्वाही नवे कुलगुरू डॉ. संजय देशमुख
यांनी दिली. मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला.
देशमुख म्हणाले, की प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्य यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते संपर्कात राहतील. विद्यार्थी किंवा कर्मचाऱ्याला त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागणार नाही. शिवाय विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, विद्यापीठाच्या ग्रंथालयातील पुस्तके, जर्नल्स आणि संशोधन प्रबंध एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे खेटे घालावे लागणार नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या डिजिटल इंडिया प्रकल्पात सामील होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात तातडीने पावले उचलली जातील, असेही ते
म्हणाले. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वायफाय इंटरनेट उपलब्ध करण्यात येईल. शिवाय विद्यापीठाचे संकेतस्थळ अद्ययावत करून मोबाइल अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या विविध विभागांच्या परीक्षा वेगवेगळ््या वेळी होतात. कधी कधी तांत्रिक किंवा नैसर्गिक कारणास्तव त्यांच्या वेळापत्रकात बदलही होतो. मात्र त्याचा ताण विद्यापीठ कर्मचाऱ्यांवर येतो. परिणामी यापुढे सर्व परीक्षा, कार्यक्रम, उपक्रम यांचे संपूर्ण वर्षाचे पूर्वनियोजन करून ते आधीच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगतिले.