‘डल्लामार’चे पुरावे देणार - मुख्यमंत्री आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:44 AM2017-12-11T05:44:38+5:302017-12-11T05:44:52+5:30
नागपूर - विरोधकांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे सभागृहासमोर मांडण्यात येतील, असे सांगत शेतकºयांच्या स्थितीला काँग्रेस-राष्ट्रवादीच कसे जबाबदार आहे हे पुराव्यांसह सादर करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिला.
विरोधकांकडून कर्जमाफी तसेच शिष्यवृत्तीसंदर्भात आरोप होत आहेत. मात्र घोटाळे करण्याची सवय असलेल्यांना प्रामाणिकपणे काम होत आहे, यावर विश्वासच बसत नाही. सिंचन घोटाळ्याची चौकशी योग्य दिशेने होत आहे. यासंदर्भात आणखी अनेक जणांवरदेखील कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची तालुकानिहाय नावे जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीसाठी एकूण ७७ लाख खात्यांचे अर्ज आले. त्यापैकी ६९ लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतली. त्यातून जवळपास ४१ लाख खात्यांचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
बोंडअळीबाबत केंद्राला प्रस्ताव
बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे नुकसान झाले आहे. ‘बीटी’चे ‘लायसन्स’ देण्यात येत असताना पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होणार नाही, असा दावा कंपन्यांनी केला होता. त्या कंपन्यांकडून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल. सोबतच ‘एनडीआरएफ’च्या माध्यमातून केंद्राकडूनदेखील मदत घेण्यात येईल. याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरोधकांची ‘टेप’ सैराटवरच अडकली
विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी राज्य शासनावर टीका करत ‘सैराट’ कारभार सुरू असल्याची टीका केली. तीन वर्षांनंतरदेखील विरोधकांची ‘टेप’ सैराटवरच अडकली आहे. त्यानंतर निघालेल्या चित्रपटांची नावे त्यांना कुणीतरी द्यावी, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.
पटोलेंना चूक लक्षात येईल
भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती. मी अद्याप ते वाचलेले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर नाना पटोले यांना आपली चूक लवकरच लक्षात येईल, असेही ते म्हणाले.