पुण्यातल्या जुन्या पुलांसाठी पालिकेची ७ कोटींची तरतूद
By admin | Published: August 4, 2016 12:48 AM2016-08-04T00:48:38+5:302016-08-04T00:48:38+5:30
जुन्या ब्रिटिशकालीन पुलांच्या देखभालदुरुस्तीची महापालिकेने काळजी घेतल्यामुळे पुणेकरांना मात्र तशा अपघाताची धास्ती बाळगण्याचे कारण नाही.
पुणे : महाड येथील ब्रिटिशकालीन पूल पावसात वाहून गेला. पुण्यातील अशाच जुन्या ब्रिटिशकालीन पुलांच्या देखभालदुरुस्तीची महापालिकेने काळजी घेतल्यामुळे पुणेकरांना मात्र तशा अपघाताची धास्ती बाळगण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी या जुन्या पुलांसह एकूण ६ पुलांसाठी महापालिकेने सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात तब्बल ७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या पुलांच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (सीईओपी) ची नेमणूक करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन पूल पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येतात. त्यांची देखभाल दुरुस्ती त्याच्या परवानगीनंतर करावी लागते. या पुलांचे बांधकाम, त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य, रचना हे सर्व वेगळे व जुन्या पद्धतीचे आहे. त्याचा अभ्यास करूनच देखभाल दुरुस्तीचे काम करावे लागते. त्याप्रमाणे काम करणाऱ्या कंपन्यांना हे काम द्यावे लागते, असे पालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी तसेच कनिष्ठ अभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.
पुण्यात ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या बऱ्याच इमारती व पूल आहेत. बंडगार्डन येथील जुन्या पूल महापालिकेच्या वतीने अलीकडेच हेरिटेज ब्रिज म्हणून विकसित
करण्यात आला. त्यासाठी त्या पुलाच्या रचनेचा खास अभ्यास पालिकेच्या हेरिटेज विभागाने केला. त्याच पद्धतीने संभाजी, शिवाजी, तसेच वेलस्ली या ब्रिटिशकालीन पुलांचा अभ्यास पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांबरोबरच तत्कालीन सरकारने, स्थानिक स्वराज्य संस्थेने बांधलेल्या आणखी काही जुन्या पुलांचीही दुरुस्ती पालिकेकडून करण्यात येत आहे. डेंगळे पुलाचा यात समावेश आहे. त्याची स्थिती वाईट झाल्याने त्यावरची जड वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर काम सुरू करण्यात आले असून, ते येत्या काही महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती बोनाला व पाटील यांनी दिली.
जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने अंदाजपत्रकात खास तरतूद केली असून, गरजेनुसार आणखी निधी हवा असेल, तर तशी मागणीही करता येते, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
>शहरातील जुन्या पुलांची सद्य:स्थिती चांगली आहे. त्यांच्या क्षमतेची चाचणीही करून घेण्यात आली आहे. मात्र, तरीही पुलांच्या मजबूतीकरणाला पालिकेकडून प्राधान्य देण्यात येते. नवा पूल बांधण्यासारखे हे काम नसते, तर जुन्या कामाची माहिती घेऊन त्याप्रमाणेच करावे लागते. त्यामुळे त्याला विलंब लागतो.
- श्रीनिवास बोनाला
प्रकल्प अभियंता, महापालिका
>महाड दुर्घटनेनंतर महापौर प्रशांत जगताप यांनी शहरातील सर्व पुलांच्या स्थितीचा नव्याने अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत. जड वाहतुकीला अनुकूल स्थिती नसेल, तर त्यावरची वाहतूक त्वरित थांबवावी, असे त्यांनी प्रशासनाला सांगितले आहे.