पं. स. उमेदवारासह पाचजण हद्दपार
By admin | Published: February 17, 2017 11:10 PM2017-02-17T23:10:29+5:302017-02-17T23:10:29+5:30
पोलिस अधीक्षक : देवरुखमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई
रत्नागिरी : विविध गुन्हे दाखल असलेल्या देवरुखमधील पाचजणांना हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. हे पाचजणही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यातील अजित ऊर्फ छोट्या दिनकर गवाणकर हे शिवसेनेकडून पंचायत समिती निवडणूक लढवीत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत व्हाव्यात, यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
आगामी निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने जिल्हा पोलिस दलाने महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ५५ अन्वये हा हद्दपारीच्या कारवाईचा बडगा उभारला आहे. देवरुख पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारी पडताळणी करून माहिती एकत्रित केली.
त्यामध्ये अजित ऊर्फ छोट्या दिनकर गवाणकर (वय ३३), नंदादीप ऊर्फ बंड्या नंदकिशोर बोरूकर (३७), मंगेश उर्फ सुरेंद्र सुरेश शिंदे (४३), सचिन सुभाष मांगले (३२) व शरीफ गणी बोदले (३१, सर्व देवरुख) यांच्याविरुद्ध २०१० पासून गर्दी, मारामारी, सरकारी कामात अडथळा असे अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याच्या हद्दपार कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
अजित गवाणकर याच्याविरुद्ध ७, नंददीप बोरुकर ६, मंगेश शिंदे ६, सचिन मांगले ४, शरीफ बोदले ४ असे एकत्रित गुन्हे दाखल होते. याआधी त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यापैकी सचिन मांगले याच्याविरुध्दचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. परंतु त्याने कोकण विभागीय आयुक्तांकडे अपील करून त्यातून सुटका करून घेतली. आता या पाचहीजणांचा प्रस्ताव एकत्र करून महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५६ ऐवजी ५५ चा वापर करून पुराव्यानिशी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला.
या कलमान्वये संबंधित व्यक्तींना हद्दपारीचे अधिकार पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रस्तावावर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी या पाचहीजणांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली.
महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव हा रत्नागिरी जिल्ह्यामधील पहिलाच असून,
जिल्ह्यातील अन्य पोलिस ठाण्यामधील अशाच प्रकारचे संघटित गुन्हे करून
दहशत निर्माण करणाऱ्या गुंड व गुन्हेगारांविरोधात कारवाईचे प्रस्ताव
सादर करण्याचे आदेश देण्यात आले
आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाकडून कारवाईचे नियोजन
करण्यात आले आहे. (वार्ताहर)
ओझरे खुर्दमधून उमेदवारी
पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी केलेल्या हद्दपारीच्या कारवाईत देवरुख येथील अजित ऊर्फ छोट्या दिनकर गवाणकर यांचा समावेश आहे. शिवसेनेतर्फे त्यांना ओझरे खुर्द पंचायत समिती गणातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण
झाले आहे.