‘से नो टू फ्रॉड’ मोहीम व्हिसाबाबत जनजागृती
By Admin | Published: June 12, 2017 02:35 AM2017-06-12T02:35:03+5:302017-06-12T02:35:03+5:30
नागरिकांच्या व्हिसामधील वाढत्या घोटाळ्यांच्या तक्रारी पाहता, ‘से नो टू फ्रॉड’ या जनजागृती मोहिमेस सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नागरिकांच्या व्हिसामधील वाढत्या घोटाळ्यांच्या तक्रारी पाहता, ‘से नो टू फ्रॉड’ या जनजागृती मोहिमेस सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत नोकरीसाठी परदेशी नेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या खोट्या आश्वासनांबाबत लोकांमध्ये जागरूकता करण्यात येणार आहे.
केरळ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक अशा दक्षिण राज्यांसह चंदीगढ, जालंधर अशा निमशहरी आणि ग्रामीण भागांतून व्हिसाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. लोकांना प्रामुख्याने आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा अशा देशांमध्ये स्थलांतर करण्याची आश्वासे दिली जातात. मात्र, ऐनवेळी विविध कारणे देऊन, त्यांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. बनावट व्हिसा एजंटची फसवणुकीची पद्धत अतिशय सोपी आहे. असंशयित लोक व्हिसा अर्जदारांना विविध नामांकित कंपन्यांची नावे घेऊन फोन करतात. या संशयितांचे फोन क्रमांकही नामांकित कंपन्यांच्या क्रमांकाप्रमाणेच असतात. त्यात संबंधित लोक व्हिसा अर्जदारांना कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देऊन माहितीची खातरजमा करण्याविषयीही सांगतात. त्यामुळे संबंधित ग्राहकांची खात्री पटते. त्यानंतर ग्राहकांना सुस्थित नोकरीचे बनावट आॅफर लेटर पाठवले जाते. त्यासाठी खोट्या ई-मेल आयडीचा वापरही केला जातो.