स्टेम सेलदान करण्याबाबत हवी जनजागृती

By admin | Published: May 4, 2017 05:59 AM2017-05-04T05:59:21+5:302017-05-04T05:59:21+5:30

रक्तातील १०० प्रकारच्या आजारावर स्टेम सेलचे प्रत्यारोपण उपयोगी ठरत असल्याने भारतात स्टेम सेलविषयी जनजागृती वाढवण्याची गरज

Public awareness about stem cell donation | स्टेम सेलदान करण्याबाबत हवी जनजागृती

स्टेम सेलदान करण्याबाबत हवी जनजागृती

Next

जान्हवी मोर्ये / डोंबिवली
रक्तातील १०० प्रकारच्या आजारावर स्टेम सेलचे प्रत्यारोपण उपयोगी ठरत असल्याने भारतात स्टेम सेलविषयी जनजागृती वाढवण्याची गरज आहे. २०२० साली भारताला १ लाख ३० हजार स्टेम सेलची गरज भासणार असल्याचा अहवाल इंडियन मेडिकल कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने दिला आहे. थॅलेसेमिया व रक्तातील कॅन्सरवरील उपचारांकरिता स्टेम सेलची आवश्यकता असते.
डोंबिवलीतील एका तीन वर्षाच्या मुलाला रक्ताचा कॅन्सर झाल्याचे जानेवारी २०१७ मध्ये उघड झाले. त्याच्यावर सध्या मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याला स्टेम सेलची आवश्यकता आहे. त्याच्या डीएनएला मिळते जुळते स्टेम सेल उपलब्ध नाहीत. डोंबिवलीतील ग्रोग्रासवाडीत जीएसबी शाळेत ३० एप्रिल रोजी जनजागृती शिबीर घेतले गेले. त्यात जवळपास २७० जणांनी स्टेल सेल दान करण्यासाठी प्रतिसाद दिला आहे.
स्टेम सेलच्या दानासंदर्भात चेन्नई येथील ‘दात्री’ नावाची सामाजिक संस्था २००९ सालापासून कार्यरत असल्याची माहिती संस्थेच्या गायत्री शेणॉय यांनी दिली आहे. रघुराज गोपाल यांनी संस्थेची स्थापना केली. संस्थेकडून पहिली दोन वर्षे केवळ जनजागृती करण्यात आली. २०११ साली स्टेम सेल आवश्यक असलेल्या रुग्णाला सर्वप्रथम ते संस्थेकडून उपलब्ध करुन देण्यात आले. संस्थेने आत्तापर्यंत २५० रुग्णांना स्टेम सेल उपलब्ध करुन दिले आहेत. आठ वर्षात केवळ २५० स्टेम सेल उपलब्ध करुन देण्याइतकीच कामगिरी का आहे, असे विचारले असता गायत्री यांनी सांगितले की, संस्थेकडे २ लाख जणांनी स्टेम सेल दान करण्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र एक लाख स्टेम सेलचे डीएनए तपासल्यावर दोन ते तीन रुग्णांशी ते जुळतात. त्यामुळे स्टेम सेल दान करण्यासाठी नोंदणी केलेल्यांचा आकडा २ लाख असून देखील प्रत्यक्ष रुग्णांना स्टेम सेल मॅच होण्याचा आकडा हा २५० इतकाच आहे. युरोपीय व अमेरिकन देशात स्टेम सेल दान करण्यासाठी नोंदणी करणारा आकडा हा १ कोटींच्या घरात आहे. विकसीत देशाच्या तुलनेत विकसनशील देशात अर्थात भारतात नोंदणीचा आकडा कमी आहे. स्टेम सेल डोनरची नोंदणी वाढण्यासाठी ‘दात्री’कडून विविध महाविद्यालयातून जनजागृतीचे कार्यक्रम केले जातात. तसेच रेडिओवरुन कार्यक्रम करुन जनजागृती केली जाते. ६० वर्षे वयापर्यंतची व्यक्ती स्टेम सेल दान करण्यासाठी नाव नोंदणी करु शकते. स्टेम सेल हे रक्तातील शंभर प्रकारच्या आजारावर उपकारक ठरु शकतात. भारतात दरवर्षी १० हजार मुले थॅलेसेमियाने आजारी आहेत. विविध प्रकारचे कॅन्सर झालेल्यांचा आकडाही देशात वाढतो आहे. त्यात रक्ताच्या कॅन्सर झालेल्या रुग्णांची संख्या वाढतेय. २०१६ मध्ये संस्थेकडे स्टेम सेलची गरज असलेल्या १२०० जणांनी आपली नावे नोंदवली. परंतु त्यात केवळ ८४ जणांनाच संस्था मदत करू शकली. दात्री सामाजिक संस्थेने केलेल्या जनजागृतीनुसार २०१६ साली संस्थेकडे स्टेम सेल दान करण्यासाठी ६२ हजार जणांनी नोंदणी केली होती. जानेवारी ते एप्रिल २०१७ या चार महिन्याच्या कालावधीत दहा हजारांनी स्टेम सेल दान करण्यासाठी नोंदणी केली आहे. मे महिन्यात अनेक महाविद्यालयांना सुट्टी असते. त्या काळात जनजागृती करता येत नाही. दर महिन्याला सरासरी १० हजार जण स्टेम सेल दान करण्याची नोंदणी करीत असल्याचा आकडा संस्थेकडे असला तरी दर महिन्याला दहा हजाराची सरासरी नोंदणी केली जाईलच, असा ठाम विश्वास ठेवता येणे अशक्य असल्याचे संस्थेच्या मार्केंटिग मॅनेजर हिंदुजा राज यांनी सांगितले आहे. संस्थेसाठी ५० स्वयंसेवक अर्ध व पूर्ण वेळेत काम पाहतात.

Web Title: Public awareness about stem cell donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.