महावितरणकडून गणेशोत्सवात वीजवापराबाबत जनजागृती
By admin | Published: September 18, 2015 12:53 AM2015-09-18T00:53:18+5:302015-09-18T00:53:18+5:30
गणेशोत्सवात विना परवाना वीज वापरली जात असल्यामुळे सर्वात जास्त तोटा होत असेल तर महावितरणचा. त्यातून वाचण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी नामी
पुणे : गणेशोत्सवात विना परवाना वीज वापरली जात असल्यामुळे सर्वात जास्त तोटा होत असेल तर महावितरणचा. त्यातून वाचण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी नामी शक्कल लढवली आहे. विजेपासून काही आपत्ती निर्माण झाली तर काय काळजी घ्यायची या माहितीबरोबरच परवानगी घेऊन वीज वापरा असे आवाहन करणारे एक निवेदनच त्यांनी व्हाटस् अॅप व अन्य माध्यमातून जारी केले आहे.
उत्सवाच्या काळात बहुसंख्य मंडळे विद्यूत रोषणाईसाठी महावितरणची वीज वापरत असतात. त्यांच्यातील अगदीच मोजकी मंडळे त्यासाठी अधिकृतपणे परवानगी घेतात. त्यामुळे उत्सवाच्या कालावधीत महावितरणची वीज तर खर्च होते, मात्र त्याचे शुल्क काही त्यांना मिळत नाही. बराच मोठा तोटा त्यांना यामुळे उत्सव काळात सहन करावा लागतो. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे.
गणेश मंडळांसाठी असलेल्या विजेचे दरच त्यांनी त्यांच्या निवेदनात जाहीर केले आहे. त्यानुसार मंडळांना फक्त ३ रूपये २७ पैसे प्रति युनिट या दराने वीज पुरवठा केला जातो. घरगुती विजेसाठीचा दर ३ रूपये ३६ पैसे प्रति युनिट व पथदिव्यांसाठीचा दर ४ रूपये २७ पैसे आहे. त्या तुलनेत मंडळांसाठीचा दर कमी असून त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत परवानगी घेऊनच उत्सवासाठी वीज वापरावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
याचबरोबर या निवेदनात विजेच्या तारा तुटल्यास काय काळजी घ्यायची याचीही माहिती दिली आहे. सर्व महावितरण अधिकारी व कर्मचारी अशा नावाने हे निवेदन व्हॉटस् अॅप वरील विविध ग्रुप्सना तसेच फेसबुकवरही पाठवण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)
- सध्या पाऊस सुरू आहे, अशा काळात विजेचा शॉक बसणे, तारा तुटुन पडणे असे प्रकार होत असतात. तसे होऊ नयेत यासाठी आधीच काळजी घ्यावी व दुर्दैवाने काही प्रकार घडलेच तर त्वरीत महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, तेथील दुरध्वनी क्रमांक मंडळाच्या दर्शनी भागावर लिहावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
- काही आपत्ती निर्माण झाली तर काय काळजी घ्यायची या माहितीबरोबरच परवानगी घेऊन वीज वापरा
- मंडळांसाठीचा दर कमी असून सर्व मंडळांनी अधिकृत परवानगी घेऊनच वीज वापरावी असे आवाहन महावितरणने केले आहे.