जादूटोणाविरोधी कायद्याची जनजागृती ठप्प, समिती कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:24 AM2018-04-04T05:24:10+5:302018-04-04T05:24:10+5:30
जादूटोणाविरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी स्थापन केलेली समिती कागदावरच असून गेल्या तीन वर्षांपासून जनजागृतीचे कार्य ठप्प झाले आहे.
- गणेश देशमुख
मुंबई - जादूटोणाविरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी स्थापन केलेली समिती कागदावरच असून गेल्या तीन वर्षांपासून जनजागृतीचे कार्य ठप्प झाले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यात निर्घृण खून झाल्यानंतर २० डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि सर्वसामान्य जनतेला या कायद्याबाबत माहिती मिळावी, यासाठी सरकारने २०१४ साली जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार, प्रसार आणि अंमलबजावणी समितीची स्थापना केली. सामाजिक न्याय मंत्री या समितीचे अध्यक्ष असून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम मानव हे या समितीचे सहअध्यक्ष आहेत.
समितीवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार श्याम मानव यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण शिबिरे आणि व्याख्यानांतून शासकीय अधिकारी आणि नागरिकांचे प्रबोधन केले. यानंतर मात्र मागील तीन वर्षांत प्रबोधनाचे कार्य पूर्णत: ठप्प पडले आहे. या कायद्याबाबत पुरेशी जागृती नसल्यामुळे भोंदूबुवा-बाबांकडून फसवणूक झालेल्या महिला तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
निधी जातो तरी कुठे?
आघाडी सरकारने या समितीसाठी वार्षिक तीन कोटी रुपयांचा निधी दिला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी तो आकडा दहा कोटींपर्यंत वाढवू, असे आश्वासन समितीला दिले होते. मात्र निधीत वाढ झाली नाही. शिवाय, तीन कोटींचा निधी दरवर्षी समितीला मिळत असताना या निधीचा वापर कसा व कशासाठी होतो, हे एक कोडेच आहे.
भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिराती
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने बसगाडीच्या मागे जादूटोणाविरोधी कायद्याच्या जाहिराती केल्या. कायद्यात जे नाहीच तो मजकूर जाहिरातीत लिहिण्यात आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या कायद्याच्या प्रभावी जनजागृतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अनेकवेळा भेटलो. उत्तम कार्य करायचे आहे एवढेच ते बोलतात. कृती शून्य आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांकडे तर वेळच नाही. प्रबोधन कार्य ठप्प पडल्याने कायदा निरुपयोगी ठरू लागला आहे.
- श्याम मानव,
जादूटोणाविरोधी कायद्याच्या
प्रबोधन समितीचे सहअध्यक्ष
जादूटोणाविरोधी कायद्याच्या जागृतीचे काम बंद आहे असे म्हणता येणार नाही. निधी कमी-जास्त असू शकतो. श्याम मानव यांचे सहअध्यक्षपदच मला कळलेले नाही. त्यांना वृत्तपत्रातच जायचे असेल तर खुशाल जावे.
- राजकुमार बडोले,
सामाजिक न्यायमंत्री