अपघातात भाऊ गमावलेल्या तरुणाची हायवेवर जनजागृती

By admin | Published: July 16, 2016 09:03 PM2016-07-16T21:03:40+5:302016-07-16T21:03:40+5:30

भाऊ गमावल्याचे दु:ख बाजूला ठेवून इतरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वोदय भांडार येथे कामास असलेल्या राजेश थिटे नामक छोट्या भावाने दिवसभर रोडवर थांबून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे

Public awareness on the highway of the youth lost the brother in the accident | अपघातात भाऊ गमावलेल्या तरुणाची हायवेवर जनजागृती

अपघातात भाऊ गमावलेल्या तरुणाची हायवेवर जनजागृती

Next
>विलास जळकोटकर/ऑनलाइन लोकमत -
सोलापूर, दि. 16 - शहरात सर्वत्र स्मार्ट सिटीचे वारे वाहू लागले आहेत. त्याच जोडीला शहराला लागून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे; मात्र हे करताना शहरानजीकच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवल्याने शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न करणा-यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आठ दिवसांपूर्वी अशाच प्रकारातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. भाऊ गमावल्याचे दु:ख बाजूला ठेवून इतरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वोदय भांडार येथे कामास असलेल्या राजेश थिटे नामक छोट्या भावाने दिवसभर रोडवर थांबून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. 
 
४ जुलै रोजी मुलाच्या बारशाची तारीख काढण्यासाठी सोलापूर शहरात गेलेला सुहास ज्ञानदेव थिटे हा तरुण दुचाकीवरुन आपल्या आईसमवेत पुणे नाका हायवेपास करुन जात असताना एकेरी पुलाजवळ समोरुन येणा-या वाहनाने धडक दिल्याने मरण पावला. त्याच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर आघात झाला. सव्वा महिन्याचे बाळ पित्याच्या छत्रापासून मुकले गेले. अशा घटना या हायवेवर वारंवार घडत आहेत. केवळ सर्व्हिस रोड नसल्याने वाहनधारक दूरवर जाऊन परत वळण्यापेक्षा शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात असे प्रकार घडू लागले आहेत. 
 
मयत झालेल्या सुहासचा छोटा भाऊ राजेश थिटे यांनी आपल्या भावावर ओढावलेला हा प्रकार इतरांवर ओढावला जाऊ नये यासाठी पुणे नाका राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सातपासून रात्री नऊपर्यंत फलकाद्वारे अपघात टाळण्यासाठी  जनजागृतीचे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. शॉर्टकट जाणा-या वाहनधारकांना थांबवून आपल्या भावाच्या अपघाताची माहिती देऊन त्यांना नियमबाह्य वाहतुकीपासून परावृत्त करतो आहे. 
 
एका तरुणाने दाखवलेली ही कळकळ समजून घेऊन वाहनधारकांनीही आपला अनमोल जीव वाचवण्यासाठी जागरुक राहण्याची गरज आहे. आणि प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी. यामुळे या भागातील विस्तारलेल्या हजारो लोकांची गैरसोय दूर होणार असल्याच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
... तर अपघाताची संख्या वाढत जाईल
मरण पावलेला सुहास मधला, मोठा भाऊ आनंद आणि सर्वात लहान राजेश थिटे हे कुटुंबीय मडकी वस्ती परिसरातील ग्रीन अपार्टमेंटमध्ये राहतात. भावाच्या अकाली जाण्याने हे कुटुंबीय खचले आहेत. असे प्रकार वारंवार घडू नयेत यासाठी पुणे नाका ते बाळे मार्गावरील सर्व्हिस रोडचे काम तातडीने होणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटना घडून अपघातातून बळी आणि जखमींची संख्या वाढल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती राजेश थिटे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Public awareness on the highway of the youth lost the brother in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.