जिल्हा रुग्णालयातही करणार अवयवदानाची जनजागृती
By Admin | Published: September 20, 2016 02:59 AM2016-09-20T02:59:58+5:302016-09-20T02:59:58+5:30
अवयवदानाविषयी जनजागृती राज्यभर होत आहे.
मुंबई : अवयवदानाविषयी जनजागृती राज्यभर होत आहे. पण, जिल्हा पातळीवर अजूनही काही ठिकाणी अवयवदान प्रक्रियेत समस्या निर्माण होतात. जिल्हा रुग्णालयांमध्येही अवयवदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा स्तरावर जाऊन ‘दी फेडरेशन आॅफ आॅर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन’ प्रशिक्षण वर्ग घेणार आहेत.
शहरी भागांत विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीमुळे संस्थांचे एक जाळे निर्माण झाले आहे. ज्या व्यक्तींना अवयवदान करायचे असले त्यांना या संस्था आणि समिती मदत करते. पण, याच पद्धतीने जिल्हा पातळीवर संस्थांचे एक जाळे निर्माण व्हावे यासाठी फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. जिल्हा रुग्णालयातही अवयवदान वाढल्यास त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जिल्हा पातळीवर अवयवदान वाढल्यास प्र्रतीक्षायादी कमी होण्यास अधिक फायदा होईल. त्यामुळे येत्या २५ सप्टेंबर रोजी मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघात एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यातील अवयवदानासाठी काम करणाऱ्या सर्व संस्था एकत्र येणार असल्याची माहिती फेडरेशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी दिली.
या परिषदेत संस्था पहिल्यांदाच एकत्र भेटणार आहेत. त्यावेळी अवयवदान प्रक्रियेत येणाऱ्या समस्या, कोणत्या भागात प्रमाण वाढते आहे अथवा कमी आहे, अशा सर्व विषयांवर चर्चा करण्यात येणार आहेत.
या परिषदेतून अवयवदान जनजागृतीसाठी एक जाळे तयार केले जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)