25 हजार मुलींच्या उपस्थितीत 'माझी कन्या भाग्यश्री'साठी जनजागृती कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 09:31 PM2018-01-01T21:31:33+5:302018-01-01T21:33:51+5:30
पुणे : मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या बुधवारी ( 3 जानेवारी) पुणे येथे २५ हजार मुलींच्या उपस्थितीत भव्य अशा जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे : मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या बुधवारी ( 3 जानेवारी) पुणे येथे 25 हजार मुलींच्या उपस्थितीत भव्य अशा जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव (जि. सातारा) या जन्मगावापासून या योजनेचा जाणीव जागृती अभियान चित्ररथ निघणार असून 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे त्याचा समारोप होणार आहे. मुलींचा जन्म आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या काळात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
बालेवाडी, पुणे येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे बुधवार 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पुणे आणि परिसरातील 25 हजार मुली सहभागी होणार आहेत. राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या मुलींना या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे. याशिवाय याच दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (जि. सातारा) येथून जाणिव जागृती अभियान चित्ररथ निघणार आहे. हा चित्ररथ 5 जानेवारी रोजी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या वणंदगाव (जि. रत्नागिरी) येथे तर 8 जानेवारी रोजी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (जि. अहमदनगर) येथे जाईल. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे या रथाचा समारोप होईल. या रथाच्या माध्यमातून मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवाचा प्रभावी जनजागर केला जाणार आहे. याशिवाय यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री आणि केंद्र शासनाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेविषयी या मोहिमेत माहिती दिली जाणार आहे, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री विद्या ठाकूर, दिलीप कांबळे, विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, नितीन काळजे, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, आमदार संग्राम थोपटे, मेधा कुलकर्णी, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, महिला झ्र बालविकास सचिव विनिता वेद झ्र सिंगल, आयुक्त लहूराज माळी, आयसीडीएस आयुक्त कमलाकर फंड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.