‘पतंजली’च्या प्रकल्पाविरोधात जनहित याचिका
By admin | Published: April 4, 2017 05:54 AM2017-04-04T05:54:37+5:302017-04-04T05:54:37+5:30
गेल्यावर्षी राज्य सरकारने योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदिक लि.ला नागपूर येथे ६०० एकर वनजमीन दिली.
मुंबई : गेल्यावर्षी राज्य सरकारने योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदिक लि.ला नागपूर येथे ६०० एकर वनजमीन दिली. मात्र राज्य सरकारच्या या व्यवहाराला आक्षेप घेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकारने अगदी किरकोळ किंमतीत हा भूखंड ‘पतंजली’ ला दिल्याने संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदार नेत्यांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी संजय निरुपम यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.
नागपूर येथील मिहान भागातील ६०० एकर वन जमीन बाबा रामदेव यांच्या मेसर्स पतंजली आयुर्वेदिक लि. दिली आहे. ही जमीन विक्रीकरण्यापूर्वी निविदा काढल्या असल्या तरी ती केवळ एक औपचारिकता असल्याचे निरुपम यांनी याचिकेत म्हटले आहे. याचिकेनुसार, जमीन लिलावात काढताना प्रत्येक एकरसाठी ३६ लाख रुपयांची बोली लावण्यात आली. मात्र ‘पतंजली’ला प्रत्येक एकरसाठी २५ लाख रुपये द्यावे लागले. प्रत्येक एकरसाठी एक कोटी रुपये, असा दर या जमिनीसाठी असतानाही राज्य सरकारने काहीही कारण नसताना पतंजलीला ही जमीन अगदी सवलतीच्या दरात दिली.
या किमतीवर संबंधित अधिकाऱ्यांनी हरकत घेतली. मात्र त्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे चौकशी करण्यासाठी पथक नेमावे. शिवाय, ही सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ‘पतंजली’ला जमिनीचा ताबा न देण्याची अंतरिम मागणी केली आहे. (प्रतिनिधी)