इंटरसिटी ट्रेनसाठी उच्च न्यायालयात धाव; ‘रेल परिषद एनएक्स’ची जनहित याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 09:57 AM2021-10-07T09:57:43+5:302021-10-07T09:58:41+5:30
मुंबई-नाशिक, पुणे-मुंबई प्रवास, मुंबई-नाशिक व पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेनला मध्य रेल्वेने अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही.
मुंबई : मुंबई-नाशिक, पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेन सुरू कराव्यात व त्या ट्रेनच्या प्रवाशांना मासिक, तिमाही, सहामाही पास द्यावे, याकरिता रेल परिषद एनएक्स या मुंबई-नाशिक ट्रेन प्रवाशांच्या संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
कोरोनामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असून आता शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, मॉल्स इत्यादींचा कारभार पूर्ववत सुरू झाला आहे. तसेच कोरोनावरील दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभाही देण्यात आली आहे. सर्व सरकारी, निमसरकारी व खासगी कार्यालये सुरू झाल्याने नाशिक व पुणे येथून मुंबईत कामाला येणाऱ्या चाकरमान्याची मोठी पंचाइत झाली आहे. कारण मुंबई-नाशिक व पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेनला मध्य रेल्वेने अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही. पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्व इंटरसिटी ट्रेन सुरू झाल्या असल्या तरी मध्य रेल्वेने मुंबई-नाशिक, पुणे-नाशिक दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी ट्रेन सुरू केल्या नाहीत. मध्य रेल्वेच्या या निर्णयाविरोधात रेल परिषद एनएक्स या संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
नाशिक व मुंबई या दोन्ही शहरांत अनलॉक करण्यात आल्याने मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची सेवा सुरळीत करण्यात यावी. तसेच मुंबई- नाशिक, पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्व इंटरसिटी ट्रेन्स सुरू कराव्यात. त्याशिवाय या ट्रेन्सला महिलांसाठी व पास असलेल्या प्रवाशांसाठी असलेले विशेष डबे जोडण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवर लवरकच सुनावणी होणार आहे.
प्रवाशांच्या मूलभूत अधिकारावर गदा
नाशिक व पुण्यातून हजारो प्रवासी उदरनिर्वाहासाठी मुंबईत येतात. मुंबईत राहणे आर्थिकरित्या परवडणारे नसल्याने या दोन्ही शहरांतील लोक कामावर येण्यासाठी ट्रेनचा पर्याय निवडतात. लॉकडाऊन दरम्यान या मार्गांवरील इंटरसिटी ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. आता सर्व कार्यालये, संस्था, आस्थापने सुरू झाल्याने लोकांना कामावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या सर्व इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र मध्य रेल्वेने मुंबई-नाशिक व पुणे-मुंबई दरम्यानच्या इंटरसिटी बंद ठेवून प्रवाशांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.