नियोजित महापालिकेची जनसुनावणी

By Admin | Published: July 18, 2016 02:36 AM2016-07-18T02:36:00+5:302016-07-18T02:36:00+5:30

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली नियोजित पनवेल महानगरपालिकेची जनसुनावणी शनिवारी कोकण भवन येथे पार पडली.

Public notice of planned municipality | नियोजित महापालिकेची जनसुनावणी

नियोजित महापालिकेची जनसुनावणी

googlenewsNext


पनवेल : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली नियोजित पनवेल महानगरपालिकेची जनसुनावणी शनिवारी कोकण भवन येथे पार पडली. जनसुनावणीवेळी आपल्या हरकती व तक्रारी नोंदविलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसुनावणी पार पडली.
महानगरपालिकेत समाविष्ट भागाचा वेध घेतल्यास अनेकांनी पनवेल महानगरपालिकेला हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र खारघर शहरातून पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट होण्यास तीव्र विरोध दर्शविण्यास येत असल्याचे याठिकाणी स्पष्ट झाले आहे.
पनवेल नगरपरिषद हद्दीसह शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ अधिसूचित (नैना) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा यामध्ये समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकत्रित करून त्यात ५ लाख ९५ हजार लोकसंख्या गृहीत धरलेली आहे. जनसुनावणी वेळी ६८ गावांपैकी बहुतांशी गावांनी महानगरपालिकेत समाविष्ट होण्यास तयारी दर्शविली. खारघर, तळोजामधील शेकडो रहिवासी, लोकप्रतिनिधी याठिकाणी उपस्थित होते. खारघरसाठी स्वतंत्र महानगरपालिका असावी असा सूर या जनसुनावणीच्या वेळी उमटताना दिसला. भाजपा, सेना महानगरपालिकेच्या बाजूने असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. नागरिकांच्या हरकती व सूचनांचा अभ्यास करून अहवाल तयार केला जाईल, त्यानंतर तो अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
खारघरमधील नागरिकांनी याठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांचा हवाला देत सद्य:स्थितीत खारघरचा महानगरपालिकेत समावेश करू नये, अशी विनंती केली. नियोजित पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगाने चार हजारांच्या आसपास सूचना व हरकती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. नियोजित महानगरपालिका परिसर व शहरामधून सर्वात जास्त सूचना व हरकती खारघर शहर व परिसरातून आलेल्या आहेत त्याची प्रचिती जमलेले विविध पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक यांच्या उपस्थितीवरून दिसून आली. पनवेल नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने प्रभाग रचना देखील करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवस नागरिकांमध्ये संभ्रम होता. हरकतींवर व सूचनांवरील सुनावणी आता देखील पार पडली असून लवकरच महानगरपालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे हे मात्र निश्चित आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Public notice of planned municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.