साहित्य संमेलनासाठी कोटींच्या उड्डाणास लोकप्रतिनिधी तय्यार
By admin | Published: April 29, 2016 04:00 AM2016-04-29T04:00:32+5:302016-04-29T04:00:32+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याकरिता किमान दोन ते अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
कल्याण : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याकरिता किमान दोन ते अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून कल्याणमध्ये संमेलन घेण्याची मागणी करणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या मागे खंबीरपणे उभे राहून संमेलन यशस्वी करून दाखवू, असा विश्वास कल्याण-डोंबिवलीचे प्रथम नागरिक राजेंद्र देवळेकर आणि अन्य काही आमदारांनी व्यक्त केला.
कल्याण सार्वजनिक वाचनालयाची मागणी अत्यंत रास्त आहे. कल्याण-डोंबिवलीमधील साहित्य रसिक गेली अनेक वर्षे संमेलनाची प्रतीक्षा करीत असल्याने यावेळी ही मागणी स्वीकारून तो मान आम्हाला द्यावा, अशी भावना येथील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.
महापौर राजेंद्र देवळेकर म्हणाले की, वाचनालयाने साहित्य संमेलनाची मागणी केली असून कल्याणसारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख असलेली नगरी संमेलन झाले तर तो दुग्धशर्करा योग असेल. सार्वजनिक वाचनालयाचा एकमेव अर्ज प्राप्त झालेला असल्याने मसापच्या कार्यकारिणीच्या नागपूर येथे होणाऱ्या बैठकीत वाचनालयाच्या मागणीचा सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे. कल्याण हे वाहतुकीच्या दृष्टीने जंक्शन आहे.
याठिकाणी सगळ््या प्रकारच्या वाहन प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच शहरात चांगली हॉटेल्स आहेत. त्यामुळे आलेल्या साहित्यिकांची चांगली व्यवस्था कल्याणमध्ये होऊ शकते. साहित्य संमेलन कल्याणला दिल्यास ते चांगल्या प्रकारे पार पाडू. त्यात कोणतीही त्रूटी राहणार नाही असा मला विश्वास वाटतो.
कल्याण पश्चिम मतदार संघाचे भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की, कल्याण नगरीत साहित्य संमेलन दिले तर तो आमच्या शहराचा गौरवच ठरणार आहे. हे संमेलन चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरीता सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. कल्याणनगरीत साहित्याचा जागर होणे आवश्यक आहे. त्यामुळे साहित्य संमेलन कल्याणला देण्याचा विचार साहित्य संमेलन कार्यकारिणीने करावा. यापूर्वी दोन वेळा फिल्म फेस्टीवल यशस्वीरित्या आयोजित केला होते. भव्य कार्यक्रम आयोजनाचा अनुभव आमच्या गाठीशी आहे. (प्रतिनिधी)