जनताच सरसकट धक्का देईल
By admin | Published: July 7, 2017 11:16 PM2017-07-07T23:16:54+5:302017-07-07T23:16:54+5:30
जनताच सरसकट धक्का देईल
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : ‘राज्य सरकार कर्जमाफीबाबत गोंधळलेले दिसते. सरसकट कर्जमाफीचा त्यांना शब्द दिलाय खरा; पण यात राजकारण आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सर्वप्रकारच्या शेतीसंबंधित कर्जाला माफी दिली नाही तर जनताच सरसकट धक्का दिल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी दिला.
येथील श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांना शुक्रवारी सायंकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, मी पहिल्यांदा कर्जमाफी देताना सर्व घटकांचा विचार करून कर्जमाफी दिली होती. ती शेतकऱ्यांच्या हिताची होती. शेतीमालाला भाव देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अन्नधान्याला भाव दिला. यावरून माझ्यावर अनेकांनी मी महागाई वाढविल्याचा आरोप केला होता. मी त्याची पर्वा केली नव्हती.
ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलीत त्यांना २५ हजारांची सवलत व ज्यांचे सहा लाख थकलेत त्यांनी साडेचार लाख भरायचे मग त्यांना दीड लाख रुपये कर्जमाफी मिळणार. कुटुंबातील एकाला कर्जमाफी हाही निर्णय चुकीचा आहे. सर्वांशी चर्चा करून राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. निर्णयाचा फेरविचार करावा,’ असेही शरद पवार यांनी सूचित केले.