उत्पादन शुल्क विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 08:45 PM2017-05-09T20:45:57+5:302017-05-09T20:45:57+5:30
व्यावसायिकांनी त्यांची दुकाने 500 मीटरच्या बाहेर असल्याच्या तसेच संबंधित रस्ते महामार्ग नसल्याचे आक्षेप नोंदवले होते.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 9 - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांलगतच्या 500 मीटरच्या आतील मद्यविक्रीला बंदी करण्यात आल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी त्यांची दुकाने 500 मीटरच्या बाहेर असल्याच्या तसेच संबंधित रस्ते महामार्ग नसल्याचे आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांची शहानिशा करण्यासाठी तसेच प्रत्यक्ष मोजणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करायला सुरुवात केली आहे.
देशभरामध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील महामार्गांवरील मद्यविक्री तातडीने बंद करण्यात आली आहे. जवळपास सोळाशे दुकाने बंद करण्यात आली आहेत. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. आदेशानंतर तातडीने मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली. अनेक दुकानदारांनी या कारवाईवर आक्षेप घेत आपली आस्थापना 500 मीटरच्या बाहेर असल्याचे सांगायला सुरुवात केली होती. काही ठिकाणी त्यामधून वादाचेही प्रसंग उद्भवू लागले होते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी विक्रेत्यांना त्यांचे आक्षेप नोंदवण्याचे आवाहन केले होते.
कारवाईच्या गडबडीमध्ये मोजणीमध्ये चूक झाली असेल तर विक्रेत्यावर अन्याय व्हायला नको, चुकून 500 मीटरच्या आतील नोंद झाली असेल तर कागदपत्रांसह निवेदन सादर करण्यासही सांगण्यात आले होते. अनेक विक्रेत्यांनी त्यांच्याकडील कागदपत्रांसह आपले आक्षेप नोंदवले. या आक्षेपांनुसार उत्पादन शुल्क विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी महत्वाच्या आणि मोठ्या ठिकाणांना प्रत्यक्षे भेट देऊन पाहणी सुरु केली आहे. मोजणी योग्य आहे का हे पुर्नमोजणी करुन तपासण्यात येत आहे. तसेच जे व्यावसायिक त्यांचे दुकान 500 मीटरच्या बाहेर हलवण्यास तयार आहेत त्यांना परवाने देण्याचेही काम सुरु करण्यात आले आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अहवालही मागवण्यात आला आहे. ज्या आस्थापना खरोखरीच 500 मीटरच्या बाहेर असतील त्या आस्थापना पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन्ही विभागांच्या अधिका-यांनी सोमवारी पुणे शहरातील विविध ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. विशेषत: जुना बाजार परिसर आणि हॉटेल ली मेरिडियनच्या परीसराची पाहणी करण्यात आली. ली मेरिडियन हॉटेल राज्य महामार्गावरच असल्याचे पाहणीमधून स्पष्ट झाले असून जुना बाजार ते ससून हा रस्ता जुना विशेष राज्य महामार्गच असल्याची माहिती या अधिका-यांनी व्यावसायिकांना दिली.
=====================
वालचंदनगरमधून जात असलेल्या राज्य महामार्गातील काही भाग इंडस्ट्रीच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, हा रस्ता कोणाच्याही मालकीचा असला तरी तो राज्य महामार्ग म्हणूनच शासकीय स्तरावर घोषित झालेला असल्यामुळे तेथेही दुकानदारांना दिलासा मिळणार नसल्याचे चित्र आहे. तर मुळशी तालुक्यातील एक रस्ता राज्य महामार्ग आहे. मात्र, हा रस्ता अर्धवटच झालेला आहे. त्या रस्त्याबाबतची कागदपत्रे आणि माहितीच उपलब्ध होत नाही. अर्धवट असलेला हा रस्ता पुढे तयारच झालेला नाही. जिथपर्यंत रस्ता झालेला आहे तेथपर्यंत बंदी करुन त्यापुढील भागात दुकाने सुरु ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली असून त्यावरही विचारविनिमय सुरु आहे.