मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचं मोठं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 21:33 IST2024-12-31T21:32:39+5:302024-12-31T21:33:04+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचा पदभार स्वीकारला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचं मोठं आश्वासन
Shivendrasinh Raje Bhosale : राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जनतेला आश्वस्त केलं आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, राज्याची सर्वांगीण प्रगती ही पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून, चुकीच्या पद्धतीने काम होत असेल किंवा जमीन हस्तांतरणात अडचणी येत असतील तर त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणे राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.