भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन
By admin | Published: January 30, 2017 03:23 AM2017-01-30T03:23:45+5:302017-01-30T03:23:45+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित झाला.
पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित झाला. भाजपाने जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षांत गोवा बेरोजगारमुक्त करण्याचा संकल्प सोडला आहे. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला जाईल. गृहआधार, दयानंद सामाजिक सुरक्षा आदी सामाजिक योजनांचा आर्थिक लाभ महागाई निर्देशांकानुसार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आदी उपस्थित होते. भाजपाने पाच वर्षांत गोव्याला सक्षम नेतृत्वाखाली स्थिर सरकार दिले. आता दुसरी इनिंग आहे. अपुरी कामे पूर्ण करणार आहोत. त्यामुळे काठावरचे बहुमत नको तर दोन-तृतियांश बहुमत गोव्यातील जनतेने भाजपाला द्यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
तरंगते कॅसिनो काँग्रेस सरकारने आणले. भाजपाने विरोध केल्यामुळे संख्या सहावर अडली. कॅसिनोंना हाकलणे अशक्य आहे. कॅसिनोंमुळे मांडवी नदीत प्रदूषण होणार
नाही, याची दक्षता घेत आहोत.
ते अन्यत्र हलविण्यासाठी पर्यायी जागाही शोधत आहोत, असे गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सांगितले.
केजरीवालांविरुद्ध गुन्हा नोंदविणार
भाजपा व काँग्रेसकडून पैसे घेऊन गोव्यात आम आदमी पार्टीला मते देण्याच्या आवाहनामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला जाणार आहे. निवडणूक आयोगाने पोलिसांना तसा आदेश दिला आहे.
झंझावाती प्रचार
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेते गोव्यात तळ ठोकून आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री तथा भाजपाचे गोवा प्रभारी नितीन गडकरींनी दोन दिवस राज्यात दौरा करत सावर्डे, शिरोडा, फोंडा, काणकोण, केपे आदी ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या रविवारी तीन सभा झाल्या. स्वतंत्रपणे निवडणूक लढविताना राष्ट्रवादीने ४० जागांपैकी १७ जागांवर उमेदवार उभे केले आहे.