जागतिक वनदिनी किशोर रिठे यांच्या 'हिरवा संघर्ष' पुस्तकाचे प्रकाशन

By admin | Published: March 22, 2017 11:07 AM2017-03-22T11:07:39+5:302017-03-22T11:07:39+5:30

किशोर रिठे यांच्या "हिरवा संघर्ष" या महाराष्ट्रातील वनांच्या संवर्धनाची स्थिती, आव्हाने व दिशा मांडणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मंत्रालयात झालेल्या एका विशेष समारंभात करण्यात आले.

Publication of the book 'Green Conflict' by World Wide Dinie Kishore Rite | जागतिक वनदिनी किशोर रिठे यांच्या 'हिरवा संघर्ष' पुस्तकाचे प्रकाशन

जागतिक वनदिनी किशोर रिठे यांच्या 'हिरवा संघर्ष' पुस्तकाचे प्रकाशन

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - जागतिक वनदिनाचे औचित्य साधून किशोर रिठे यांच्या "हिरवा संघर्ष" या महाराष्ट्रातील वनांच्या संवर्धनाची स्थिती, आव्हाने व दिशा मांडणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मंत्रालयात झालेल्या एका विशेष समारंभात करण्यात आले.  २१ मार्च रोजी संपूर्ण जगभर "जागतिक वनदिन" साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंत्रालयातील सहाव्या माळ्यावरील मुख्य सचिवांच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव श्री. सुमित मल्लीक (भा. प्र. से.), मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री.प्रवीण परदेशी (भा. प्र. से.) व सुप्रसिद्ध कवी श्री. अशोक नायगावकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
 
पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने किशोर रिठे यांचे "हिरवा संघर्ष" हे पुस्तक वाचकांपुढे आणले आहे. त्यांचे "रानावनाचे मूड्स" हे जंगलांचे विविध मूड्स मांडणारे व ते आज माणसांच्या मूड्स वर कसे अवलंबून आहे हे सांगणारे पहिले पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात किशोर रिठे यांनी पुस्तकाविषयी आपले विचार मांडले. राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी पुस्तकाच्या विषयाबद्दल व मांडणी बद्दल लेखकाचे कौतुक केले. हे पुस्तक राज्यातील वनसंरक्षणासाठी उपयुक्त ठरणारे आहे असेही ते म्हणाले.  मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. प्रविण परदेशी यांनी मराठी भाषेतील वने व वनसंवर्धन हा विषय अशा प्रकारे मांडणारे कदाचित हे पहिले पुस्तक असावे, असे मत व्यक्त केले. यासाठी त्यांनी लेखकाचे तसेच पद्मगंधा प्रकाशनाचे श्री. अरुण जाखडे यांचे अभिनंदन केले. सुप्रसिद्ध कवी श्री. अशोक नायगावकर यांनी यावेळी या विषयावर आधारित दोन सुंदर कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.  
 
या छोटेखानी समारंभास पद्मगंधा प्रकाशनाचे श्री. अरुण जाखडे, लेखक किशोर रिठे यांच्यासह नागपूरचे कवी श्याम माधव धोंड, बी.एन.एच.एस.चे संचालक डॉ. दीपक आपटे, प्रख्यात वन्यजीव प्रेमी बिट्टू सहगल, प्रधान सचिव (वने) विकास खारगे, प्रधान सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) आशिष कुमार सिंग, प्रधान सचिव (आदिवासी विकास)श्रीमती मनीषा वर्मा, कवी अरुण म्हात्रे, महाराष्ट्र पत्रकार अधिस्विकृती मंडळाचे अध्यक्ष श्री. यदु जोशी, मनोज भोयर, हिंदूच्या लैला बावदम,विनय कुलकर्णी सचिव (सिंचन),सह सचिव (सिंचन)संजय बेलसरे, विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर राठोड, अमोल सावंत, संजय विधळे          मनीष चव्हाण, विक्रम देशमुख  व अनेक मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचलन नागपूरचे कवी श्री. श्याम माधव धोंड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाशक श्री. अरुण जाखडे यांनी केले.  
 
"हिरवा संघर्ष" या पुस्तकाविषयी 
सार्वजनिकतेची शोकांतिका या जटील समस्येवर उपाय शोधणाऱ्यांना २००९ साली नोबेल पुरस्कार मिळाला. या अमुल्य तत्वज्ञानाचा वापर करून भारतातील वनांच्या वेदनांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न किशोर रिठे यांनी या पुस्तकात केला आहे. महाराष्ट्रात गेले दशकभर सुरू असलेल्या वनसंवर्धनाच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन वनसंरक्षणाचे अंतिम ध्येय कसे साध्य होऊ शकेल, हे सांगणारा मार्ग वाचकांना व निसर्गप्रेमींना पथदर्शी ठरणारा आहे. 
 
महाराष्ट्रातील वनांनी वेढलेल्या गावांचे प्रश्न सोडवण्याची गुरुकिल्ली म्हणा, की राज्यातील वनांना सांभाळणाऱ्या सुनियोजित प्रयत्नांचा आढावा म्हणा, यातील प्रत्येक लेख वाचकाला वनांच्या रक्षणासाठी हिरवा संघर्ष करण्यासाठी तयार करणारा आहे. "पर्यावरण" आणि "वाद" याच्या पलीकडे जाऊन साकारलेल्या या पुस्तकातील याशोगाथा प्रेरणादायी आहेत.  
 
महाराष्ट्राच्या वनाच्छादित प्रदेशांमध्ये सुरू असलेला हिरवा संघर्ष या पुस्तकात मांडला आहे. जंगल, पाणी, कोळसा व शेतजमिनी धडाधड संपवून चक्क "भारतमातेलाच" विकायला उभी झालेली भ्रष्ट राजकीय-प्रशासकीय यंत्रणा कशी बदलणार यावर पुस्तकात चिंतन आहे. परंतू  फक्त प्रश्न मांडून दुःख वाटण्यापेक्षा, येथे उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातील या पर्वता एवढ्या हिरव्या संघर्षासाठी तयार राहण्याची प्रेरणा या पुस्तकातून वाचकांना मिळावी याचा प्रयत्न या पुस्तकातून लेखकाने केला आहे.
(फोटो: पद्मगंधा प्रकाशनाने काढलेले पुस्तक "हिरवा संघर्ष" चे मुखपृष्ठ)                        
 

Web Title: Publication of the book 'Green Conflict' by World Wide Dinie Kishore Rite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.