ग्रामीण भागात प्रचार करा अन्यथा कारवाई!
By admin | Published: January 14, 2017 05:09 AM2017-01-14T05:09:20+5:302017-01-14T05:09:20+5:30
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी
मुंबई : महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक मंत्र्याला ग्रामीण सभा घ्यावीच लागतील. जे मंत्री गावागावात सभा घेणार नाहीत त्यांना कारवाईला सामारे जावे लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आपल्या मंत्र्यांना दिल्याचे समजते.
आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या उद्धव ठाकरे यांनी बैठकांचे सत्र चालविले. मातोश्री या निवासस्थानी गुरुवारी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतल्यानंतर उद्धव यांनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंत्री आणि आमदारांवर जिल्हावर जबाबदारी सोपविण्यात आली. युती झाल्यास भाजपाला कोणत्या जागा सोडायच्या यावरही चर्चा झाली.
नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेना मंत्र्यांनी दौरे न केल्याने शिवसेनेला फटका बसल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकात मंत्र्यांना ग्रामीण भागात फिरावेच लागेल, अशी ताकीद उद्धव यांनी आपल्या मंत्र्यांना दिली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री दीपक सावंत, राज्यमंत्री दीपक केसरकर, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर यांच्यासह मुंबईतील आमदार सुनिल प्रभू, अनिल परब, अजय चौधरी उपस्थित होते. मातोश्री बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांची हजेरी घेतल्याच्या वृत्ताला रामदास कदम यांनी दुजोरा दिला. प्रचारासाठी सर्व मंत्र्यांना ग्रामीण भागात जावे लागेल, सभा घ्याव्याच लागतील, असे सक्त आदेश उद्धव यांनी दिले असून ते स्वत: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)