प्रकाशकांच्या बहिष्कारावर लवकरच तोडगा!
By admin | Published: February 9, 2015 05:10 AM2015-02-09T05:10:38+5:302015-02-09T05:10:38+5:30
घुमानच्या साहित्य संमेलनाकडे प्रकाशकांनी नफा-तोट्याच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. कारण मराठी भाषेची सेवा करणाऱ्या प्रकाशकांशिवा
बालासाहेब काळे, हिंगोली
घुमानच्या साहित्य संमेलनाकडे प्रकाशकांनी नफा-तोट्याच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. कारण मराठी भाषेची सेवा करणाऱ्या प्रकाशकांशिवाय साहित्य व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. याबाबत लवकरच बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढला जाईल़ प्रकाशकांनी बहिष्काराची भूमिका मागे घ्यावी, असे आवाहन ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ सदानंद मोरे यांनी रविवारी केले़
डॉ. मोरे यांनी संत नामदेव महाराज यांच्या जन्मस्थळी नर्सी येथे रविवारी भेट दिली. संत नामदेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असून, या पवित्र स्थळी येण्याची इच्छा संमेलनाच्या योगामुळे पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ़ मोरे म्हणाले, संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी संमेलनाध्यक्ष या नात्याने आपण केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर संत नामदेवांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या गावांमधील वास्तूंची नीट व्यवस्था व्हावी, नर्सीतील प्रस्तावित सातमजली राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकर मार्गी लागावे, यासाठी आपण पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. साहित्य संमेलने म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग असे म्हणणारे भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ़ मोरे यांची प्रतिक्रिया विचारली असता, नेमाडे यांची भूमिका वेगळी असू शकते. मात्र साहित्यिक म्हणून मी त्यांचा आदरच करतो. म्हणून बातमी समजल्याबरोबर त्यांचे अभिनंदन केले, असे ते म्हणाले. बेळगावात मराठी माणसांची होणारी मुस्कटदाबी ब्रिटिशकाळातील राज्यकर्त्यांची कटू आठवण जागवणारी असून, हा प्रकार निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले.
घुमान येथे मराठी माणसांचे वास्तव्य नसल्याने संमेलनाध्यक्षांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अध्यक्षीय भाषण विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी भाषणाचे इंग्रजी, हिंदी, पंजाबी आदी भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी दिली.