प्रकाशकांची ‘घुमानवारी’ नाहीच...
By admin | Published: January 24, 2015 01:35 AM2015-01-24T01:35:46+5:302015-01-24T01:35:46+5:30
पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी न होण्याचा काही प्रकाशकांनी शुक्रवारी पुनरुच्चार केला.
पुणे : पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी न होण्याचा काही प्रकाशकांनी शुक्रवारी पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातच विभागीय साहित्य संमेलन घेण्याबाबत कोणत्याच हालचाली न झाल्याने घुमानला जाण्यास इच्छुक नसल्याचे या प्रकाशकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
संमेलनासाठी आलेल्या निमंत्रणापैकी उस्मानाबादचा विचार न करता साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान या गावी घेण्याचा निर्णय महामंडळाने जाहीर केल्यानंतर राज्य प्रकाशक परिषदेने काही महिन्यांपूर्वी रीतसर पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. घुमान येथे मराठी भाषिकांची संख्या खूप कमी आहे त्यामुळे या भागात ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून पुस्तकांची विक्री होणार नसल्याने या भागात केवळ ‘विभागीय संमेलन’ घ्यावे आणि समांतर साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या संदर्भातील रीतसर पत्रही प्रकाशक परिषदेने महामंडळाला दिले होते.
यासंबंधी स्वागताध्यक्ष आणि महामंडळाच्या अध्यक्षांकडे माध्यमांकडूनही वारंवार विचारणा केली असता यावर मध्यम
तोडगा काढण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. त्यानुसार साधकबाधक चर्चेमध्ये महाराष्ट्रात विभागीय संमेलन घेण्याचा तोडगा काढण्यात आला. मात्र त्यावर कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. (प्रतिनिधी)