प्रकाशकांना पुन्हा डावलले
By admin | Published: December 7, 2015 02:10 AM2015-12-07T02:10:19+5:302015-12-07T02:10:19+5:30
मराठी साहित्य संमेलनादरम्यान साहित्यप्रेमी आणि प्रकाशक, पुस्तक विक्रेत्यांमध्ये महत्त्वाचा दुवा असणाऱ्या साहित्य महामंडळाने यंदाही डावलल्याची भावना प्रकाशकांमध्ये आहे
पुणे : मराठी साहित्य संमेलनादरम्यान साहित्यप्रेमी आणि प्रकाशक, पुस्तक विक्रेत्यांमध्ये महत्त्वाचा दुवा असणाऱ्या साहित्य महामंडळाने यंदाही डावलल्याची भावना प्रकाशकांमध्ये आहे. घुमान साहित्य संमेलनात प्रकाशकांच्या अडचणी समजून घेऊ, असे लेखी आश्वासन देऊनही ते महामंडळाने न पाळल्याने प्रकाशक, पुस्तकविक्रेत्यांचा अपमान झाल्याचे बोलले जात आहे.
संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा साहित्य महामंडळाने निर्णय घेतल्यानंतर प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त करीत काही मुद्दे उपस्थित केले होते. विविध प्रश्न उपस्थित करून साहित्य संमेलनात सहभागी न होण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
संयोजन समितीमध्ये प्रकाशक परिषदेचे २ प्रतिनिधी घेऊ, असे हैदराबादला झालेल्या महामंडळाच्या बैठकीनंतर प्रकाशन परिदषदेला लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले. पण पिंपरी-चिंचवडला होणाऱ्या ८९व्या संमेलनाच्या आयोजनातही परिषदेच्या प्रतिनिधींचा समावेश न केल्याने प्रकाशकांमध्ये नाराजी आहे. संमेलनाच्या स्टॉल वाटपाला सुरुवात झाली आहे, पण आयोजक अथवा महामंडळाने प्रकाशक परिषदेशी संपर्क साधलेला नाही.
महामंडळ प्रकाशकांना ठरवून डावलत आहे. त्याचप्रमाणे स्टॉलचे भाडे ४ हजारांवरून ५ हजार रुपये झाल्याचे प्रकाशक परिषदेचे अनिल कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संमेलनाच्या आयोजकांच्या प्रतिनिधींनीही प्रकाशकांशी चर्चा करू असे म्हटले होते, पण कुणीही चर्चा केली नसल्याचे ते म्हणाले.
पिंपरीच्या संमेलनासाठी स्टॉल नोंदणीला सुरुवात झाली आहे. पण प्रकाशक, विक्रेत्यांना स्टॉल कसे उभारले जातील, तेथे काय सुविधा असतील, याचीही माहिती महामंडळाने दिलेली नाही. स्टॉलच्या संख्येवरही बंधन घातल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)