पावसाने पालघर झाले जलयुक्त शिवार
By admin | Published: June 28, 2016 03:07 AM2016-06-28T03:07:25+5:302016-06-28T03:07:25+5:30
पालघर शहरामध्ये पडलेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने पालघर नगरपरिषदेची पोलखोल केली आहे.
पालघर : पालघर शहरामध्ये पडलेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने पालघर नगरपरिषदेची पोलखोल केली आहे. कोटयावधी रूपये गटार बांधणी व सफाई वर खर्च करणाऱ्या नगरपालिकेच्या क्षेत्रातील भागात अनेक ठिकाणी पाणी साचले तर काही लोकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे पालघर शहराला जलयुक्त शिवाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
पालघर नगरपालिका क्षेत्रातील मैला व घाण वाहून नेण्यासाठी माहीम रोड वर बांधण्यात आलेल्या गटारींसाठी ३ कोटी ९८ लाख रूपये कचेरी रोड वरील गटार उभारणीसाठी १ कोटी ८० लाख तर जगदंबा हॉटेल ते टेंभोडे रोड दरम्यान गटार बांधण्यासाठी १ कोटी ९८ लाख असा सुमारे ८ कोटीची निधी खर्च करण्यात येत आहे. परंतु योग्य नियोजनाचा अभाव, व्यक्ती तसा न्याय ही प्रवृत्ती व मालकांना विश्वासात न घेता जमीन ताब्यात घेण्याची बेकायदेशीर प्रवृत्ती, इ. अनेक कारणामुळे गटार बांधणीची कामे अपुऱ्या अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे पाऊस पडताच गटारीत तुंबलेली सर्व घाण रस्त्यावर येऊ लागली आहे. तसेच शहरात पडलेल्या पावसाचा निचरा होण्याचा व वाहुन जाण्याचा मार्गच मिळत नसल्याने या घाण पाण्याने शहरातील अनेकांच्या घरात शिरकाव केला आहे.
त्यामुळे लोकमान्य नगर, काळे मार्ग, स्ततर गाळा, खाणपाडा, विष्णूनगर, मोहपाडा, इ. भागातील अनेक घरात पाणी शिरले. विद्यमान नगरसेविका डॉ. उज्वला काळे यांच्या घरातही पाणी शिरल्याने नगरपरिषदेने पावसाळयापूर्वी केलेल्या गटार सफाईचा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)
>गटार सफाईवर उधळपट्टी
पालिकेने २०११-१२ मध्ये गटार सफाईसाठी २१ लाख ५७ हजार , २०१२-१३ , ३३ लाख २५ हजार , २०१४-१३ साली ६६ लाख ४३ हजार, २०१४-१५ ,७२ लाख २६ हजारांचा खर्च केला आहे.
गटारे सफाईसाठी ३१/१०/२०१५ च्या सर्व साधारण सभेमध्ये ठेकेदाराला १५ लाख २६ हजार रूपयाचे देयक देण्याबाबतची अवैध मंजूरी घेतली.पाण्याचा निचरा व्हावा म्हणून नगरपालिकेवर जेसीबी वापरण्याची पाळी ओढावली आहे.