न्यायाधीशांच्या दिशेने फेकली चप्पल
By Admin | Published: February 10, 2016 04:36 AM2016-02-10T04:36:46+5:302016-02-10T04:36:46+5:30
चार वर्षांपासून दरोड्याच्या खटल्यामध्ये केवळ तारखाच पडत राहिल्याने वैतागलेल्या एका आरोपीने सुनावणीच्या वेळी चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकून शिवीगाळ करण्याची
मुंबई : चार वर्षांपासून दरोड्याच्या खटल्यामध्ये केवळ तारखाच पडत राहिल्याने वैतागलेल्या एका आरोपीने सुनावणीच्या वेळी चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकून शिवीगाळ करण्याची घटना मंगळवारी कुलाबा येथील जिल्हा सत्र न्यायालयात घडली. त्याच्या या आकस्मिक कृतीमुळे कोर्टातील सर्व जण भांबावून गेले. मदन चौहान (वय ३०) असे या आरोपीचे नाव असून त्याच्या या कृतीबद्दल कुलाबा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
एका दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये चेंबूरमधील आरसीएफ पोलिसांनी २०१२ मध्ये चौहानला अटक केली होती. त्याच्या खटल्यासाठी त्याला सुनावणीसाठी पाचारण केले जात होते. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कुलाबा येथील सत्र न्यायालयाचे न्या. एस.व्ही पाटील यांच्यासमोर त्याला उभे करण्यात आले. कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख मिळाल्याने चौहानला संताप आला आणि त्याने आपली चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. चप्पल कोर्टाच्या डायसला लागून खाली पडल्याने न्यायाधीशांना दुखापत झाली नाही. त्यानंतर चौहानने न्यायाधीशांना शिवीगाळ केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौहानविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)