शॅगीच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती भोपळा!

By admin | Published: April 18, 2017 05:51 AM2017-04-18T05:51:22+5:302017-04-18T05:51:22+5:30

बोगस कॉल सेंटर घोटाळ्याच्या मुख्य आरोपीस अटक करून आठवडा उलटला, तरी त्याच्या चौकशीतून पोलीस अद्याप कोणतीही महत्त्वाची माहिती मिळवू शकलेले नाहीत

Pumpkin in police custody from Shaggy! | शॅगीच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती भोपळा!

शॅगीच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती भोपळा!

Next

ठाणे : बोगस कॉल सेंटर घोटाळ्याच्या मुख्य आरोपीस अटक करून आठवडा उलटला, तरी त्याच्या चौकशीतून पोलीस अद्याप कोणतीही महत्त्वाची माहिती मिळवू शकलेले नाहीत. अवघ्या २४ वर्षांचा हा आरोपी १० दिवसांपासून पोलीस यंत्रणेला गोलगोल फिरवत आहे.
अमेरिकन नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या ठाण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी आॅक्टोबर २०१६मध्ये केला होता. या टोळीचा सूत्रधार सागर ठक्कर उर्फ शॅगी तेव्हापासूनच फरार होता. ठाणे पोलिसांसह इंटरपोल आणि अमेरिकेच्या एफबीआयनेदेखील शॅगीच्या अटकेसाठी जाळे विणले होते. ८ एप्रिल रोजी दुबईतून आलेल्या शॅगीला मुंबई विमानतळावर ठाणे पोलिसांनी अटक केली. शॅगीची अटक ठाणे पोलिसांसाठी नक्कीच महत्त्वाची होती; पण, त्याच्या चौकशीतून पोलीस काहीही साध्य करू शकले नाहीत.
कॉल सेंटर घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यापासून पोलीस यंत्रणेसह प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांनीच घोटाळ्याचे वेगवेगळे आकडे मांडले. आकड्यांमध्ये तफावत असली तरी १०० कोटींपेक्षा कमी रकमेचा अंदाज कुणीच वर्तवला नाही. ८ एप्रिलपर्यंत पोलिसांच्या ताब्यात केवळ सहआरोपी होते. त्यामुळे घोटाळ्यातील रकमेच्या वसुलीचा प्रश्न समोर आला नाही. आता शॅगीच्या अटकेनंतर स्वाभाविकपणे हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप ते यशस्वी ठरले नाहीत. गुन्हे शाखेच्या वरिष्ठांपासून आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच शॅगीची चौकशी केली. पण, पैसा तर सोडा, या घोटाळ्याशी संबंधित आरोपींची माहिती देण्यासाठीही शॅगीने तोंड उघडलेले नाही.
शॅगीची १० बँकांमध्ये खाती आहेत. या खात्यांमध्ये जवळपास ४० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कॉल सेंटरमधून आपल्या वाट्याला फार कमी रक्कम यायची. ही रक्कम आधीच खर्च झाली असल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. भारतात येण्यापूर्वी त्याने संपूर्ण मालमत्तेसह रोख रकमेचीही विल्हेवाट लावली, याची खात्री पोलिसांना जवळपास पटली आहे. त्यामुळेच १० दिवसांच्या चौकशीनंतरही पोलिसांचे हात रितेच आहेत. न्यायालयासमोर शॅगीने पोलीस कोठडीपर्यंत विरोध केलेला नाही. उलटपक्षी, तुरुंगापेक्षा पोलीस कोठडी बरी, असे त्याने पोलीस अधिकाऱ्यांसमोर सांगितले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pumpkin in police custody from Shaggy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.