पुणेरी पाट्यांतून उमेदवारांना फटके
By Admin | Published: February 13, 2017 12:44 AM2017-02-13T00:44:40+5:302017-02-13T00:44:40+5:30
पुणेरी पाट्या भल्याभल्यांच्या टोप्या उडवितात. विविध पक्षांच्या टोप्या घालून नागरिकांच्या दारात येणाऱ्या उमेदवारांच्या टोप्या उडवून पुणेरी पाट्यांनीही प्रचारात
पुणे : पुणेरी पाट्या भल्याभल्यांच्या टोप्या उडवितात. विविध पक्षांच्या टोप्या घालून नागरिकांच्या दारात येणाऱ्या उमेदवारांच्या टोप्या उडवून पुणेरी पाट्यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे.
पुणेरी पाट्या हे पुणेरी संस्कृतीचे एक व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. त्यामुळे निवडणुकीच्या धामधूमीत अनेक पुणेरी पाट्या शहरात पाहायला मिळत आहेत. पुण्यामध्ये सगळेच पक्ष स्वबळावर लढत असल्याने निवडणुकीच्या रिंगणात एकूण पाच उमेदवार आहेत. त्यांचे प्रभागातील चौघे मिळून २० उमेदवार होतात. याशिवाय अपक्ष म्हणून रिंगणात असलेले वेगळेच. त्यामुळे सतत दारावरची बेल वाजत असल्याने वैतागून जाऊन एका पुणेकराने दारावर पाटीच लावली की ‘आमचे नाव मतदारयादीत नाही, तरी आमचा व आपला वेळ वाया घालवू नये.’ ही पाटी पाहून उमेदवार हळूच काढता पाय घेत, दुसऱ्या घराची बेल वाजवित आहेत.
पुणेरी टोमणे म्हणून सध्या व्हॉट्सअॅपवर एक पाटी फिरत आहे. प्रचाराची पत्रके लावून भिंत विद्रुप करणाऱ्यांना यामध्ये चांगलाच इशारा दिला आहे. ‘ही खासगी सोसायटी असून, कुठल्याही उमेदवाराचे भिंतीवर पोस्टर लावलेले दिसल्यास त्या फोटोवर गंध लावून हार घातला जाईल.’ आपली ही पाटी फाडली जाईल हे लक्षात घेऊन ‘हा कागद फाडून टाकल्यास आमच्याकडे याच्या सहा झेरॉक्स तयार आहेत’ असा इशाराही सेक्रेटरीच्या नावाने दिलेला या पाटीत दिसतो.
पुण्याच्या मध्यभागात कधीच न दिसणाऱ्या उमेदवारांना काही पाट्यांद्वारे चांगलेच टोमणे मारले आहेत. यापूर्वी याच पद्धतीच्या ‘नगरसेवक गायब’ नावाने फलक लावण्यात आले होते. आता प्रचारात नगरसेवक दिसू लागल्याने ‘नगरसेवक सापडले, ते पुन्हा आपल्या भेटीला आलेत’ असे फलक लावलेले दिसून येत आहेत.