पेंचचा वाघ पुण्याच्या वाटेवर!
By Admin | Published: August 11, 2014 12:55 AM2014-08-11T00:55:51+5:302014-08-11T00:55:51+5:30
विदर्भातील ‘वाघ’ हा उपराजधानीची नवी ओळख बनला आहे. म्हणूनच नागपूरला ‘व्याघ्र राजधानी’ चा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याचवेळी वन विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पातील
एनजीओचा विरोध : प्रादेशिक वाद उफाळण्याची भीती
नागपूर : विदर्भातील ‘वाघ’ हा उपराजधानीची नवी ओळख बनला आहे. म्हणूनच नागपूरला ‘व्याघ्र राजधानी’ चा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याचवेळी वन विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पातील एक वाघ पुणे शेजारच्या कात्रज येथील राजीव गांधी ज्युलॉजिकल पार्कमध्ये पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वन विभागाच्या या निर्णयाचा वन्यजीव प्रेमी संघटना तीव्र विरोध करीत आहे. अनेक संघटनांनी रस्त्यावर उतण्याची तयारी सुरू केली आहे. शिवाय काही संघटनांनी स्थानिक नेत्यांना मध्यस्थी करण्याची विनंती करून, विदर्भातील वाघ पुण्याला जाण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे. यामुळे वन विभागाने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर फार मोठा प्रादेशिक वाद उफाळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विदर्भ हा नेहमीच अन्याय सहन करीत आहे. यात आता वन विभाग पुन्हा भर घालण्याचा प्रयत्न करीत आहे. वन विभागाचा हा निर्णय पूर्णत: विदर्भ विरोधी मानल्या जात आहे.
सध्या हा वाघ पेंच व्याघ्र प्रकल्पातील एका मोठ्या एन्क्लोजरमध्ये राहत आहे. त्याच्यासोबत पुन्हा दोन वाघिणीही आहेत. वन विभागाने गत काही दिवसांपूर्वी या तिन्ही वाघांना जंगलात सोडण्याची योजना तयार केली होती. मात्र त्यासाठी गत जानेवारीमध्ये आलेल्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व वन्यजीव तज्ज्ञांच्या एका चमूने तिघांपैकी केवळ दोन वाघिणीच जंगलात सोडण्याच्या स्थितीत असल्याचे स्पष्ट करून, वाघ हा जंगलात सोडण्यासाठी ‘अनफिट’ असल्याचे सांगितले होते. त्यावर वन विभागाने त्या वाघाला राज्यातील एखाद्या प्राणिसंग्रहालयात पाठविण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला महाराज प्रशासनाने त्याला आपल्याकडे ठेवण्याची तयारी दाखविली. परंतु त्या मोबदल्यात महाराज बागेतील अन्य एक वाघिण वन विभागाने स्वीकारावी, अशी अट घालण्यात आली होती. वन विभागाने ती अट फेटाळून लावली. मात्र काहीच दिवसांत महाराज बाग प्रशासनाने माघार घेतली, अन् त्या वाघाला स्वीकारण्यास तयार झाले.
शिवाय त्यासंबंधी महाराज बागेचे प्रभारी डॉ. सुनील बावीस्कर यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाला पत्र पाठविले. परंतु आता वन विभाग त्याला महाराज बागेत पाठविण्यास तयार नाही.
वन विभाग त्याला कात्रज येथे पाठविण्यावर अडून बसला आहे. दुसरीकडे वन्यजीव क्षेत्रात काम करीत असलेल्या सृष्टी संस्थेचे पदाधिकारी तो वाघ नागपुरातच राहावा, यासाठी प्रयत्न करीत आहे.(प्रतिनिधी)
असा रोमांचक प्रवास..
-सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील एन्क्लोजरमध्ये असलेल्या तिन्ही वाघांचा प्रवास फारच रोमांचक आहे. गत चार वर्षांपूर्वी चंद्रपूरशेजारच्या जंगलात हे तिन्ही वाघांचे बछडे आपल्या आईपासून भटकले होते. यात एक नर व दोन मादा बछड्यांचा समावेश होता. अनेक दिवस ते तसेच भटकत राहिले. भूक व तहानेने व्याकूळ झाले. शेवटी जंगलात गस्त घालत असलेल्या एका वन कर्मचाऱ्याची त्यांच्यावर नजर पडली. त्या वन कर्मचाऱ्याने वरिष्ठांना माहिती दिली. यानंतर त्या तिन्ही बछड्यांना चंद्रपूर येथे आणण्यात आले. अनेक दिवसांपासून उपाशी असल्याने ते कमजोर झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला. शिवाय काही दिवसानंतर त्यांना वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यात हलविण्यात आले. येथे एका सुरक्षित पिंजऱ्यात त्यांचे पालन-पोषण करण्यात आले. ते थोडे मोठे होताच, त्यांना शिकारीचे प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर गत दोन वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पात मोठे एन्क्लोजर तयार करण्यात आले. सध्या ते त्या एन्क्लोजरमध्ये राहत आहे.
पीसीसीएफ म्हणतात, वाघ पुण्यालाच जाणारच
-यासंबंधी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी वन विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघ कात्रज येथे पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्याला आता महाराज बागेत पाठविण्याचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचेही ते म्हणाले. महाराज बाग प्रशासनाकडून वन विभागाला पत्र प्राप्त झाले असून, त्यावर वन विभागाने त्यांना महाराज बागेत वाघ पाठविणार नसल्याचे कळविले असल्याचेही त्यांनी सांगितले.