पुण्याचा अभिषेक डोगरा ‘नीट’मध्ये राज्यात प्रथम
By Admin | Published: June 24, 2017 04:39 AM2017-06-24T04:39:18+5:302017-06-24T04:39:18+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेत पंजाबचा नवदीप सिंग हा देशात पहिला आला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेत पंजाबचा नवदीप सिंग हा देशात पहिला आला असून, पुण्याच्या अभिषेक डोगराने देशात पाचवा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
देशातील सुमारे ४७० वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ६५,१७० एमबीबीएस व २५,७३० बीडीएसच्या जागांसाठी, तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी नीट घेण्यात आली होती. त्याचा निकाल ८ जून रोजी अपेक्षित असताना, मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे निकाल लांबणीवर पडला होता. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निकालाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर शुक्रवारी आॅनलाइन निकाल जाहीर करण्यात आला.
पुण्याच्या अभिषेकने ७२० पैकी ६९१ गुण मिळविले आहेत. विदर्भातील अकोल्यामधील विक्रम काटे हा राज्यात दुसरा आला आहे. ओबीसी प्रवर्गातून तो राज्यात पहिला आहे. विक्रमने ७२० पैकी ६७३ गुण पटकावले आहेत. लातूरमधील राजर्षी शाहू महाविद्यालयाचा विवेक विठ्ठल शामंते हा अनुसूचित जमाती संवर्गातून ६०० गुण मिळवून देशात ५ वा आला आहे. पुण्यातीलच ऋचा हेर्लेकर हिने ६८० गुणांसह देशात ३३ वा क्रमांक मिळविला आहे.
देशभरातून ११ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६ लाख ११ हजार ५३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली असून, उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ३ लाख ४५ हजार ३१३ विद्यार्थिनी आहेत. उत्तीर्ण मुलांची संख्या २ लाख ६६ हजार २२१ आहे. देशात मध्य प्रदेशातील अर्चित गुप्ता हा दुसऱ्या क्रमांकावर तर मनिष मूलचंदानी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
देशात पहिला आलेला नवदीप सिंग हा पंजाबमधील मुक्तसरचा असून, त्याने नीटमध्ये ९९.९ पर्सेंटाइल मिळवले आहेत. त्याचे वडील सरकारी शाळेत मुख्याध्यापक आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्तीर्ण झालेल्यांची संख्या खूपच मोठी आहे. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाला वैद्यकीय वा दंतवैद्यक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याची चिन्हे कमीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.