पुणे: अविवाहितेच्या प्रसुतीस नकार देणाऱ्या पालिकेच्या डॉक्टरांवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 06:52 PM2017-11-30T18:52:56+5:302017-11-30T18:54:07+5:30
पुण्यात कुमारी मातेच्या प्रसुतीला महापलिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी नकार दिल्याप्रकरणी पालिकेच्या डॉक्टरांवर कारवाई होणार आहे.
पुणे : पुण्यात कुमारी मातेच्या प्रसुतीला महापलिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी नकार दिल्याप्रकरणी पालिकेच्या डॉक्टरांवर कारवाई होणार आहे. कोथरूड भागात राहणाऱ्या एका गर्भवती तरूणीची प्रसूती करण्यास महापलिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी ती अविवाहित असल्याने नकार दिल्याप्रकरणी योग्य ती दखल घेतली जाईल अशी माहिती आज महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांना दिली. आयुक्तांनी त्या डॉक्टरांविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कार्यवाही सुरु करण्यात आल्याचे सांगितले आहे.
महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयाने एका महाविद्यालयात शिकणाऱ्या कुमारी मातेच्या प्रसुतीला नकार दिल्याची घटना घडली होती. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात तरुणीने बाळाला जन्म दिला. डॉक्टर कुलदीप वाघ आणि डॉक्टर राधिका वाघ यांच्या ब्लोझम वुमन केअर सेंटरमध्ये या तरुणीची प्रसुती झाली. तरुणीने एका मुलाला जन्म दिला.
पुण्यात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच आ. डॉ. गोऱ्हे यांच्या स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे व विभावरी कांबळे यांनी याबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली. याबाबत महापालिका आयुक्तांकडे गो-हे यांनी विचारणा केली होती. त्यास प्रतिसाद देत आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.