पुणे विमानतळावर सात किलो सोने पकडले
By admin | Published: January 10, 2015 12:46 AM2015-01-10T00:46:13+5:302015-01-10T00:46:13+5:30
पुणे विमानतळाच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहामध्ये तस्करीचे सात किलो सोने मिळून आले असून, त्याची किंमत १ कोटी ९२ लाख रुपये आहे.
पुणे : पुणे विमानतळाच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहामध्ये तस्करीचे सात किलो सोने मिळून आले असून, त्याची किंमत १ कोटी ९२ लाख रुपये आहे. सीमाशुल्क विभाग आणि विमानतळ प्रशासनाला मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
सीमाशुल्क विभागाचे आयुक्त वसा शेषगिरी राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारजाह येथून येणाऱ्या स्पाईस जेट विमानामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सोन्याची तस्करी होण्याची शक्यता असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सर्वांना सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे विमानतळाच्या इमारतीमध्ये शोध मोहीम राबवल्यानंतर पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात काळ्या रंगाच्या चिकटपट्टीमध्ये गुंडाळलेले सात किलो सोने मिळून आले. १ कोटी ९२ लाख रुपये किंमत असलेल्या या सोन्याची शासकीय व्हॅल्युअरकडून तपासणी करून घेण्यात आली. हे सोने परदेशी बनावटीचे असून, त्याची शुद्धता ९९.५ टक्के आहे.
प्रवासी सोने घेऊन पुण्यात आल्यानंतर हे सोने स्वच्छतागृहात ठेवून विमानतळावरच काम करणारा एखादा कर्मचारी ते ताब्यात घेऊन बाहेर जाण्याची पद्धती कार्यरत असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. विमानतळामध्ये काम करणारा कोणी या प्रकरणाची शहानिशा करण्यात येत असल्याचे राव यांनी सांगितले.