पुणे - बेंगलुरु महामार्ग आठ दिवसांच्या कालावधीनंतर उद्यापासून वाहतुकीसाठी खुला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 08:20 PM2019-08-12T20:20:55+5:302019-08-12T20:21:23+5:30
पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे मागील आठ दिवसांपासून बेंगलुरू महामार्गावरून कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक ठप्प होती...
पुणे : बेंगलुरू महामार्गावरील शिरोली गावात महापुराचे पाणी आल्याने मागील आठवडाभरापासून बंद असलेली रस्ते वाहतुक मंगळवार (दि. १३) पासून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आठ दिवसांच्या कालावधीनंतर स्वारगेट आगारातून पहिली एसटी बस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, सांगलीकडे जाणाºया रस्त्यावर अद्याप पाणी असल्याने याभागात एसटी बंदच राहणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे मागील आठ दिवसांपासून बेंगलुरू महामार्गावरून कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक ठप्प होती. शिरोली आणि किणी गावात तसेच बेळगावीकडून कोल्हापुरकडे येताना निपाणीजवळ महामार्गावर पुराचे पाणी आले होते. रविवारपर्यंत शिरोली आणि किणी गावातील पाणी काही प्रमाणात कमी झाल्याने जीवनावश्यक वस्तु असलेली काही मोठी वाहने सोडण्यात आली. तर पाणीपातळी आणखी कमी झाल्याने सोमवारी दुपारनंतर अन्य वाहनेही सोडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, आठ दिवसांपासून एकही वाहन न गेल्याने हजारो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्ता बंद असल्याने एसटी महामंडळाकडून कोल्हापुरकडे जाणाºया सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता वाहतुक सुरू झाल्याने महामंडळाकडून मंगळवारी पहिली बस सोडण्यात येणार आहे.
स्वारगेट आगारातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसचे संचलन होते. या आगाराचे व्यवस्थापक पी. एल. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून कोल्हापुरकडे वाहने जाण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या मार्गावर वाहनांची गर्दी तसेच तिकडे जाणारे प्रवासी नसल्याने एसटी बस सोडण्यात आली नाही. मंगळवारपासून बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार बस वाढविण्यात येतील. सांगलीकडे जाणारा मार्ग अद्याप बंदच आहेत. त्यामुळे तिकडे जाणाऱ्या बस पुर ओसरेपर्यंत बंदच राहतील. एक-दोन दिवसात हा मार्गही सुरू होईल, अशी शक्यता आहे.
------------